robbery case Pudhari
अहिल्यानगर

Rahuri youth attack robbery: राहुरीत भरदिवसा तरुणावर सशस्त्र हल्ला; रोकड, दागिणे, कागदपत्रे लुटली

सात जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: राहुरी शहरात तरुणावर लोखंडी शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे लुटल्याची थरारक घटना घडल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात तक्रारदार अक्षय बाबासाहेब गोपाळे यांनी तक्रार दिली असून, घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी त्यांनीच पोलिसांसमोर सविस्तर विषद केली आहे.

दाखल तक्रारीनुसार, रंगा सरोदे, गणेश सरोदे, सुनील सरोदे, रविंद्र पाटोळे, योगेश चोपडे, गोरख बडे व मयूर गायकवाड (सर्व रा. राहुरी परिसर) यांनी एकत्रितपणे अक्षय गोपाळे यांच्यावर हल्ला चढवला.

हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपींनी लोखंडी गज, फायटर आणि पाइपसारखी घातक हत्यारे वापरत अक्षय यांना लक्ष्य केल्याचा दावा गोपाळे यांनी केला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, हल्ल्यादरम्यान योगेश चोपडे याने पाठीवर व डोक्याच्या मागील भागावर लोखंडी गजाने प्रहार केले.

मयूर गायकवाड याने लोखंडी फायटरने डोळ्याजवळ वार करत जखमी केले. तर गोरख बडे याने अक्षय यांच्या वडिलांवर लोखंडी पाइपने हल्ला करत त्यांच्या पायाला दुखापत केली. याच वेळी आरोपींनी लूटमार करत अक्षय यांच्या वडिलांच्या खिशातील पाकीट काढून त्यातील सुमारे 30 हजार रुपये रोख रक्कम तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स अशी कागदपत्रे लंपास केली. तसेच अक्षय यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळे सोन्याची चेन, खिशातील 10 हजार रुपये आणि कानातील सोन्याची बाळीही हिसकावण्यात आली.

आरोपींनी शिवीगाळ करत ‌‘पुन्हा आमच्या नादी लागलास तर जिवंत ठेवणार नाही,‌’ अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता वारंवार फोन करूनही धमकावल्याचे अक्षय गोपाळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. जखमी अवस्थेत अक्षय गोपाळे व त्यांचे वडील यांना प्रथम राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारानंतर अक्षय गोपाळे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार नोंदवली. विशेष म्हणजे, या घटनेपूर्वी पाटोळे यांच्या तक्रारीनुसार अक्षय गोपाळे व त्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गोपाळे यांनी वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर 7 जणांविरोधात गुन्हा नोंदविली आहे.या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT