राहुरी: शहरात पार पडलेल्या हळदी समारंभातील आनंदावर विरजण घालणाऱ्या 6 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिणे चोरीप्रकरणी राहुरी पोलिसांनी थेट मध्यप्रदेशात जावून छडा लावला. दागिणे हस्तगत करण्यात राहुरी पोलिसांनी दाखविलेले चातुर्य व धाडसासह सांघिक कार्यामुळे अखेर नवदांपत्याच्या आयुष्यातील आनंद पुन्हा परतला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार चोरीस गेलेले सर्व दागिने मंगळवारी फिर्यादींकडे सुपूर्त करण्यात आले.
नाशिक येथील शैला भास्कर सोनवणे विवाहानिमित्त राहुरी येथील विठ्ठला लॉन्समध्ये हळदी समारंभासाठी आल्या होत्या. नवरी मुलीचे सुमारे 6 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्यांच्या ताब्यात सुरक्षित होते, मात्र समारंभाच्या गडबडीत अज्ञात चोरट्याने दागिने लंपास केले. या प्रकारामुळे लग्नघरातील आनंदाचे वातावरण क्षणार्धात चिंतेत बदलले. याप्रकरणी राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. आरोपींनी कोणताही ठोस पुरावा न ठेवता अत्यंत चलाखीने गुन्हा केल्यामुळे तपासास मोठे आव्हान उभे राहिले होते, मात्र पोलिसांनी हार न मानता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, लग्न समारंभातील छायाचित्रे, संशयितांच्या हालचालींसह तांत्रिक विलेषणाच्या आधारे तपास चक्रे वेगाने फिरवली.
अशाप्रकारचे गुन्हे मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पचोर तालुक्यातील कडिया साँसी गावातील टोळी करतात, अशी माहिती पुढे आली. त्या अनुषंगाने पोलिस पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. बोर्डा पोलिस स्टेशन हद्दीत चौकशी केली असता, आरोपीचे नाव क्रिश सिकंदर सिसोदिया असल्याचे निष्पन्न झाले. गावात छापा टाकताना स्थानिकांकडून विरोध किंवा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता, स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठ्या फौजफाट्यासह नियोजनबद्ध पोलिस कारवाई करण्यात आली. छाप्यात राहुरीत चोरीस गेलेले सुमारे 6 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधिक्षक, सोमनाथ वाक्चौरे व उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाट, सहाय्यक फौजदार तुळशीराम गिते व काळे, पोलिह हेड काँस्टेबल सूरज गायकवाड व सतिष आवारे, पोलिस नाईक अशोक कुदळे, पोलिस काँस्टेबल प्रमोद ढाकणे, सतीश कुराहडे, नदीम शेख, जयदीप बडे, योगेश आव्हाड यांचा समावेश होता. पोलिसांच्या यशस्वी कामगिरीमुळे नवदांपत्यासह कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.
‘ते’ दागिणे नवरीचे..!
नवरी मुलीचे सुमारे 6 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्यांच्या ताब्यात सुरक्षित होते, मात्र समारंभाच्या गडबडीत अज्ञात चोरट्याने दागिने लंपास केले. या प्रकारामुळे लग्नघरातील आनंदाचे वातावरण क्षणार्धात चिंतेत बदलले होते.