

नगर: जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 765 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार प्रारुप प्रभागरचना 7 एप्रिल रोजी प्रसिध्द होणार आहे. या ‘प्रारुप’वर दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय झाल्यानंतर 4 मे 2026 रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिध्द होणार आहे.
दरम्यान, 2024 व 2025 या दोन वर्षांतील मुदत संपलेल्या 99 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागरचना यापूर्वीच प्रसिध्द झालेली आहे.मात्र, अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नसल्याने ग्रामपातळीवरील राजकीय कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.
लोकसभा, विधानसभा निवडणुकांमुळे गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे गावपातळीवरील कारभार प्रशासककांच्या माध्यमातून सुरु आहे. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. या निवडणुका झाल्यानंतरच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.17) या वर्षभरात मुदत संपणाऱ्या 765 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला. 20 फेब्रुवारीपासून या कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.
या ग्रामपंचायतींचे प्रारंभी नकाशे अंतिम केले जाणार असून, त्यानंतर प्रभाग तयार करुन सीमा निश्चित केल्या जाणार आहेत. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रभागरचनेची तपासणी केल्यानंतर प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी यांना 11 मार्चपर्यंत सादर केला जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव मान्यतेसाठी 17 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. आयोगाने मान्यता दिल्यानंतर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिल्यानंतर तहसीलदार आपापल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींची प्रारुप प्रभागरचना 7 एप्रिल 2026 रोजी प्रसिध्द करणार आहेत.
प्रभागरचनेचा असा कार्यक्रम
‘प्रारुप’वर 7 ते 13 एप्रिल : हरकती स्वीकारल्या जाणार
16 ते 21 एप्रिलपर्यंत हरकतींवर सुनावणी
23 एप्रिलपर्यंत अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर
28 एप्रिलपर्यंत अंतिम प्रस्ताव आयोगाकडे जाणार
जिल्हाधिकारी 4 मेपर्यंत अंतिम प्रभागरचना प्रसिध्द