राहुरी : श्रीरामपूरमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडल्याने तिन्ही घटकपक्ष स्वतंत्र लढण्याचे शनिवारी स्पष्ट झाल्यानंतर आता राहुरीतही पालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेना स्वतंत्र लढण्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीत जागा वाटपाबाबत सन्मानपूर्वक तोडगा न निघाल्यास शिवसेना सर्व जागांवर स्वतंत्र लढेल, असा ठाम निर्धार रविवारी (दि. 9) माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी येथे व्यक्त केला. शिवाय पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.(Latest Ahilyanagar News)
लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची बैठक रविवारी झाली. यावेळी इच्छुक उमेदवारांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी रणनीतीवर शिक्कामोर्तब केले. यावेळी जिल्हाप्रमुख (दक्षिण) बाबूशेठ टायरवाले, युवा नेते राजू शेटे, शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे, युवा सेना जिल्हाप्रमुख (उत्तर) शुभम वाघ, तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे व शहरप्रमुख गंगाधर उंडे व शिवसैनिक उपस्थित होते.
लोखंडे म्हणाले, की राहुरी नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने कामाला लागावे. निवडणुकीची जबाबदारी राजू शेटे व तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे यांच्यावर असेल. महायुतीत जागा वाटपाबाबत सन्मानपूर्वक तोडगा न निघाल्यास शिवसेना स्वतंत्र सर्व जागांवर लढेल, असा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला.
प्रास्ताविक करताना देवेंद्र लांबे यांनी नगरपालिकेच्या प्रभाग रचनेविषयी माहिती दिली. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा आदेश येताच शिवसेना राहुरीत पूर्ण ताकदीने निवडणूक मैदानात उतरेल, असे ते म्हणाले.
राजू शेटे म्हणाले की, या निवडणुकीत सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना संधी दिली जाईल. यावेळी शिवसेनेचाच नगराध्यक्ष होणार आहे.
रवींंद्र मोरे म्हणाले की, राहुरीतील सर्वसामान्य शिवसैनिक शेतकरी आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची मुले राजकारणातील समीकरणे ठरवतील.
टायरवाले यांनी, हिंदुत्ववादी युवकांना संधी देऊ, असा शब्द दिला. महायुतीमध्ये शिवसेनेचा विचार न झाल्यास सर्व जागांवर शिवसेना स्वतंत्र लढेल. उमेदवारांवर कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास, थेट संपर्क साधा, असा इशारा त्यांनी दिला.
बांधकाम कामगार सेनेचे समन्वयक अशोक तनपुरे, तालुकाप्रमुख बापूसाहेब काळे व शिवउद्योग शहरप्रमुख नामदेव वांढेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. युवा सेना राहुरी तालुकाप्रमुखपदी सचिन करपे (32 गाव) यांची निवड करण्यात आली.
रोहित नालकर, विजय उंडे, सुभाष जुंदरे, टाकळीमिया शहरप्रमुख विजय तोडमल, अविनाश क्षीरसागर, अरुण निमसे, भाऊराव उंडे, नितीन तनपुरे, धनंजय गुलदगड, ईश्वर मासरे, उमेश कवाने, महेश घोरपडे, संदीप करपे, कुमार निमसे, प्रसाद कवाने, अमोल खंगले, मनोज बेलदार, संकेत कुमटकर, दीपक घावटे, शंकर आढाव, बाबासाहेब वांढेकर, महेंद्र गायकवाड, अमोल थोरात, योगेश फसले, मयूर कोल्हे आदी शिवसैनिक उपस्थित होते. ॲड. भाऊसाहेब पवार यांनी आभार मानले.