Rahuri School Bus Accident Pudhari
अहिल्यानगर

Rahuri School Bus Accident: राहुरीत विद्यार्थिनींना घेऊन जाणारी बस खड्ड्यात पलटी; १५ ते २० जखमी, पाच गंभीर

तांदुळवाडी परिसरातील अपघाताने शालेय वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी शालेय विद्यार्थिनींना घरी घेऊन जाणारी खासगी बस खड्ड्यात उलटल्याने दुर्घटना घडली. या अपघातात १५ ते २० विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यापैकी चार ते पाच विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बसच्या स्टेअरिंग यंत्रणेतील बिघाडामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस रस्त्यालगतच्या सुमारे १० ते १५ फूट खोल खड्ड्यात उलटली. अपघातानंतर बसमधील विद्यार्थिनींमध्ये एकच आरडाओरड झाली. काही विद्यार्थिनी बसमध्ये अडकून पडल्या होत्या, तर अनेकजणी भीतीने हादरून गेल्या. राहुरी येथील भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींना घरी सोडण्यासाठी शिलेगाव येथील खासगी बस चालक दत्तात्रय म्हसे हे सुमारे ३० ते ३५ विद्यार्थिनींना घेऊन निघाले होते. राहुरी रेल्वे स्टेशन-तांदुळवाडी मार्गावर बस प्रवास करत असताना स्टेअरिंगचा रॉड अचानक तुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन खोल खड्ड्यात पलटी झाली.

अपघाताची माहिती मिळताच तांदुळवाडी, शिलेगाव व परिसरातील ग्रामस्थ, युवक आणि वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत बसमधील विद्यार्थिनींना बाहेर काढले आणि जखमींना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले. जखमी विद्यार्थिनींवर राहुरी येथील डॉ. गिरगुणे हॉस्पिटल, डॉ. महाडिक हॉस्पिटल आणि लाईफ लाईन केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची वार्ता समजताच पालकांनी रुग्णालयांकडे धाव घेतली. आपल्या मुली सुरक्षित असल्याची खात्री होईपर्यंत पालकांचा जीव टांगणीला लागला होता. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी जखमी विद्यार्थिनींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मुख्याध्यापक सर्जेराव पेरणे, सरपंच विराज धसाळ, पत्रकार विनीत धसाळ, शरदराव पेरणे, विक्रम पेरणे, संदीप म्हसे, गोकुळ म्हसे, प्रा. शिवप्रसाद पेरणे, सिद्धार्थ पेरणे, ओंकार तोडमल, भूषण निकम, तेजस विटमोर, विशाल आयनर आदी युवकांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या जीवाशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, अशी पालकांची मागणी असून शालेय वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सुरक्षिततेकडे दुर्लक्ष?

तालुक्यातील अनेक शाळांमध्ये खासगी वाहनांद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. मात्र या वाहनांची तांत्रिक तपासणी, फिटनेस प्रमाणपत्र, सुरक्षितता उपाययोजना आणि क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक याकडे संबंधित यंत्रणांचे कितपत लक्ष आहे, असा प्रश्न अपघातानंतर उपस्थित झाला आहे.

ग्रामस्थांची तत्परता, दुर्घटना टळली

बसमध्ये सुमारे ३० ते ३५ विद्यार्थिनी प्रवास करत होत्या. बस खोल खड्ड्यात उलटल्याने गंभीर दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. स्थानिक युवकांच्या धाडसामुळे अनेक विद्यार्थिनींना वेळेत उपचार मिळू शकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT