राहुरी : राहुरीतही मुसळधार पावसाने थैमान घातले. परतीच्या पावसाची 66.3 मि.मी नोंद प्रशासनाने घेतली आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारच्या तुलनेत काल मंगळवारी (दि.16) रोजी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून आले. (Ahilyanagar Latest News)
परतीच्या पावसाने राहुरीतही जनसामन्यांचे जीवन विस्कळीत केल्याचे दिसून आले. जोरदार वृष्टी होत असल्याने राहुरीतही सर्व शाळांना सुट्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरीच थांबावे लागते. तर काल मंगळवारी (दि.16) रोजी हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत होत्या. सकाळच्या सत्रानंतर पावसाने उघडिप घेतली होती. परंतू सायंकाळी पुन्हा रिमझिम सरी कोसळत असल्याचे दिसून आली. सलग पडणार्या पावसाने निर्माण झालेला ओलावा तसेच साचलेल्या पाण्यामध्ये भर पडत असल्याने शहरासह गावोगावी रस्त्यांवर नदीप्रमाणे पाणी वाहत असल्याचे चित्र आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेले ओढे नाल्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पावसाचा पाण्याचा कहर दिसून येत आहे. शासकीय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार खुडसरगाव हद्दीत ओढा फुटल्याने शेतकर्यांच्या शेतामध्ये पाणी घुसल्याचे सांगण्यात आले.
मुळा धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आला आहे. सोमवारी रात्री 12 हजार क्यूसेक पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला होता. दरम्यान, पाऊस ओसरत असल्याचे पाहता धरणाचा विसर्ग केवळ 1 हजार क्यूसेक करण्यात आला आहे. धरण साठा 25 हजार 945 दलघफू (99.78 टक्के) स्थिर राखत उर्वरीत आवकेची पाणी विसर्गाद्वारे सोडले जात आहे. धरणाकडे नविन पाण्याची आवक 977 क्यूसेक इतकी होत आहे.
प्रशासनाकडून सतर्कताः तहसीलदार सलग पडणार्या पावसामुळे प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात असल्याचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले. खुडसरगाव हद्दीमध्ये ओढा फुटल्याने शेतकर्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्याने नुकसान झाली आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने अधिक अधिक जिवितहाणी किंवा वित्तहाणी झाली नसल्याचा अहवाल असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून सततच्या झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्व भागात तर शेती पिकाला तळ्यांचे स्वरूप आल्याने हतबल झालेल्या शेतकर्यांनी या पाण्यामध्ये पोहून आपला रोष व्यक्त करत पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई ची मागणी केली आहे.
दोन दिवसापासून राहुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापुस, कांदा, पिके पाण्याखाली गेली आहे. काल सोमवार दि. 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी राहुरी तालुक्यात सलग चार तास मुसळधार पाऊस झाला. खुडसरगाव, पाथरे, वळण, मानोरी, आरडगांव, मालुंजा, माहेगाव, शेनवडगाव, कोपरे, वाजुंळपोई, तिळापुर, मांजरी, कोंढवड, शिलेगाव, तांदुळवाडी, केंंदळ आदिंसह राहुरीच्या पुर्व भागातील पुर्ण पिके वाया गेली. सोयाबीनला मोड आले तर कांदा रोपे वाहुन गेली. खुडसरगाव, टाकळीमियॉ येथील रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी कपाशी पिकात साचलेल्या पाण्यामध्ये पोहून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
तर रविंद्र मोरे, लालजी निशाणे, रामेश्वर पवार, शिवराज पवार, रवींद्र आढाव, सुरेश निमसे, सुनिल मोरे, प्रकाश देठे, सतिष पवार आदिंसह शेतकर्याने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शासनाकडे मदतीची मागणी केली.