Rahuri Cyber Fraud
राहुरी : सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा शिक्षित वर्गालाच गंडा घातला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्राध्यापक यांची शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. एका ॲपद्वारे गुंतवणूक केलेल्या 3 कोटींचे 22 कोटी झाले, असे दाखविण्यात आले; परंतु पैसे काढण्याचा प्रयत्न करताच सर्व काही हवेत विरले. आता प्राध्यापकाने सायबर पोलिसात धाव घेतली आहे.(Latest Ahilyanagar News)
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्राध्यापकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवा, असा संदेश आला. त्यानंतर एका अज्ञात लिंकवरून ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला छोट्या रकमेवर नफा दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असे सांगण्यात आले.
प्राध्यापकांनी या प्रलोभनाला बळी पडत जवळपास 3 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. काही दिवसांतच ॲपवर दाखविलेली रक्कम 22 कोटी रुपये झाली. प्राध्यापकांचा आनंद गगनात मावेना. मात्र, पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर व्यवहारच थांबले. ॲपव्दारे शेअर्स विकले तरी पैसे न मिळाल्याने संशय निर्माण झाला. शेवटी संबंधित ॲप बनावट असून त्या नावाचे शेअर्सच मार्केटमध्ये अस्तित्वातच नसल्याची धक्कादायक माहिती प्राध्यापकांना समजली. आता आपली तीन कोटींची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
दरम्यान, सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. गुन्हेगारांनी कोणत्या बँक खात्यांतून व्यवहार केले, ॲप कोणत्या देशातून कार्यरत होते, याचा तपास सुरू आहे.
सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्तींच्या सल्ल्याने शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी किंवा गुंतवणुकीचे ॲप डाऊनलोड करू नका. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी ती सेबी नोंदणीकृत आहे का, हे तपासा. या घटनेनंतर शैक्षणिक क्षेत्रात आणि शहरात चर्चा सुरू झाली आहे. शिक्षित व्यक्तीही अशा सायबर फसवणुकीला बळी पडू शकते, मग सामान्य नागरिकांनी किती सावध राहावे? असा प्रश्न पडू लागला आहे.