राहुरी: राहुरी पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परता आणि दक्षता दाखवत दोन अल्पवयीन मुलींचा चोवीस तासांच्या आत शोध घेऊन त्यांना पालकांकडे सुखरूप स्वाधीन दिले. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत चालू असलेल्या या मोहिमेत मागील 22 महिन्यांत शोधलेल्या मुलींची संख्या आता 97 वर पोहोचली आहे.
राहुरी बु येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अज्ञात कारणांमुळे घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या पालकांनी रात्री आठ वाजता राहुरी पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. राहुरी पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. तपासादरम्यान संबंधित मुलगी राहुरी रेल्वे स्टेशनजवळ रुळांच्या बाजूला दिसत असल्याची खबर मिळाली. तत्काळ पोलिस पथक घटनास्थळी पोहचले.
तेथे शोध घेतल्यावर मुलगी मानसिक तणावात आणि एकटी अवस्थेत आढळून आली. काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या दक्षतेमुळे तिला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर मुलीला तिच्या पालकांकडे सुरक्षित सोपविण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.तर दुसऱ्या घटनेत कात्रड येथील मुलगी 18 फेब्रुवारी 2025 रोजी अज्ञात व्यक्तीकडून पळवून नेल्याची तक्रार राहुरी पोलिसांकडे आली होती. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि सलग शोध मोहिमेमुळे ही मुलगी अखेर पोलिसांना मिळाली असून तिला सुरक्षित तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईसाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांनी मार्गदर्शन केले. तर कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, हेडकॉन्स्टेबल संभाजी बडे, कर्मचारी संदीप ठाणगे, अंकुश भोसले, वंदना पवार यांच्यासह पथकाने केली.
दरम्यान, मुलांशी संवाद कमी होत असल्याने त्यांच्यात निर्माण होणारा ताण, भावनिक एकटेपणा आणि मोबाईलवरील आहारी जाण्यामुळे अशा घटना वाढताना दिसत आहे. मित्र-मैत्रिणींबाबत माहिती ठेवावी आणि मोबाईल वापरावर योग्य नियंत्रण ठेवावे, असे आवाहन राहुरी पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.