Sujay Vikhe Patil Pudhari
अहिल्यानगर

Rahuri Traffic Jam: राहुरीत नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडी; डॉ. सुजय विखे पाटील रस्त्यावर

कोंडी सोडवण्यासाठी थेट हस्तक्षेप; गरज पडल्यास होमगार्डचा पगार स्वतः देण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: नगर-मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. कामाच्या संथ गतीमुळे सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी रविवारी (दि. 18) स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीवर उपाययोजनांबाबत सूचना केल्या.

डॉ. विखे पाटील यांनी महामार्गावरील विविध ठिकाणी थांबून वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेतली. रस्त्याचे अपूर्ण काम, अव्यवस्थित वळणमार्ग, तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिक तीव्र होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. नागरिक, वाहनचालक आणि स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांनी अडचणी थेट ऐकून घेतल्या. या वेळी पोलिस प्रशासन आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना

वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना डॉ. विखे यांनी दिल्या. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे, वाहतूक नियंत्रणासाठी तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित करणे, तसेच कामाच्या ठिकाणी सूचनाफलक आणि प्रकाशव्यवस्था वाढवण्यावर त्यांनी भर दिला.

होमगार्डचा पगार मी स्वतः देईन!

डॉ. सुजय विखे पाटील यांनी केवळ सूचना देऊन थांबण्याऐवजी जबाबदारी स्वतःवर घेतली. वाहतूक नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी मनुष्यबळ अपुरे आहे, तेथे होमगार्डची तातडीने नियुक्ती व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांचा त्रास कमी व्हावा, वाहतूक सुरळीत व्हावी आणि दैनंदिन जीवन विस्कळित होऊ नये, यासाठी गरज भासल्यास होमगार्डचा पगार मी स्वतः देईन, असे ठाम आश्वासन त्यांनी दिले.

महामार्ग कामाची गती वाढवावी

सध्याच्या परिस्थितीत केवळ प्रशासनच नव्हे तर नागरिकांनीही संयम ठेवणे आवश्यक असल्याचे डॉ. विखे यांनी अधोरेखित केले. विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, वाहतूक व्यवस्थेचा सन्मान ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच डॉ. महामार्गाच्या कामाचा वेग वाढवण्याची गरज अधोरेखित केली. काम वेळेत पूर्ण झाल्यासच कायमस्वरूपी दिलासा मिळेल, असे सांगत त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांवरही जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT