राहुरी: नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या अडचणी संपता संपताना दिसत नाही. राहुरीत सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अखेर माजी खासदार डॉ. सुजय विखे व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेतला आहे. विखेंनी होमगार्डचे पगार खिशातून देण्याची तयारी दर्शवल्यानंतर, काल तनपुरेंनीही प्रत्यक्षात प्रसाद शुगरची सुरक्षा यंत्रणाच रस्त्यावर उतरवून वाहतूक कोंडी सोडवली. प्रवाशांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर ‘राहुरी’त दोन्ही ‘दादा’ चांगलेच ॲक्टीव्ह झाल्याने अनेकांना हायसे वाटले.
नगर-मनमाड रस्त्याची साडेसाती संपण्याची अपेक्षा सर्वांनाच आहे. राहुरी शहर हद्दीमध्ये ठेकेदाराकडून रस्त्यावर डांबर ओतण्याचे काम सुरू आहे. वाहतूक कोंडी सुरू असतानाच, काल दुसऱ्यांदा माजी खा. डॉ. सुजय विखे हे राहुरीत रस्त्यावर उतरले. सोमवारी दि. 19 जानेवारी रात्री सुमारे 10.30 वाजता डॉ. विखे पाटील नगर- मनमाड महामार्गावर उपस्थित दिसले. त्यांनी वाहतूक कोंडीची ठिकाणे पाहून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. अडलेल्या वाहनांजवळ जाऊन प्रवाशांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संबंधित प्रशासन व यंत्रणांना जागेवरच स्पष्ट सूचना देत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा ठाम इशारा दिला. यावेळी देवळाली प्रवरा येथील नगरसेवक ऋषभ लोढा, अक्षय तनपुरे, मनोज गव्हाणे, महेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनीही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य केले.
दरम्यान, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या निर्देशानुसार प्रसाद शुगर कारखान्याचे सुरक्षा रक्षक रस्त्यावर उतरवण्यात आले. या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियंत्रणात मोलाची मदत केली. ठेकेदाराने सुमारे दोन किलोमीटर अंतरावर डांबरीकरण केल्याने शहरातील बहुतांश एकेरी वाहतूक कमी झाली. दरम्यान, विखे व तनपुरे या दोघांनीही समन्वयातून नगर-मनमाड रत्याच्या प्रश्नाबाबत पुढाकार घेत सहकार्याची जबाबदारी घेतली. राहुरी शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एकेरी वाहतूक सुरू आहे. बसस्थानक हे थेट नगर-मनमाड रस्त्यालगत आहे. राहुरी बाजार समितीचे प्रवेशद्वारही रस्त्यालगतच आहे. परिणामी बसस्थानक व बाजार समितीत ये जा करणाऱ्या गाड्या व मालवाहतूक वाहनांमुळे वाहतूक वेळोवेळी खोळंबत असते.
डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट इशारा
मी विश्वासात घेऊन काम करणारा माणूस आहे. निष्ठावान व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची साथ मला लाभली आहे. आमचे कार्यकर्ते फक्त घोषणाबाजी करत नाहीत; ते आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून करतात.जिथे ट्रॅफिक जाम आढळेल, तिथे कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेतील. केवळ एकदा येऊन फोटो काढून लोकांना न्याय मिळत नाही, हे मला माहीत आहे. आज केवळ एका तासाचा अपवाद वगळता कुठेही वाहतूक ठप्प नव्हती. मागील काही दिवसांत झालेल्या त्रासाबद्दल मी राहुरीकरांची मनापासून माफी मागतो.
सोशल मीडियात श्रेयवादाची राजकीय लढाई
माजी खासदार डॉ. सुजय विखे व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सामाजिक दायित्व ओळखत नगर-मनमाड रस्त्याच्या समस्येबाबत पुढाकार घेतला. परंतु नेहमीप्रमाणे सोशल मीडियामध्ये ‘आमचाच नेता कसा श्रेष्ट’ हे दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी धडपड सुरू झाल्याचे दिसले. तर, मागिल वर्षी राहुरी हद्दीतच 55 बळी गेले, याचा विसर पडू न देता, आता तरी हे काम जलदगतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा सामाजिक संघटनांनी केली.