Rahuri Khandoba Yatra 2026 Pudhari
अहिल्यानगर

Rahuri Khandoba Yatra 2026: राहुरीकरांचा ‌‘येळकोट येळकोट जय मल्हार‌’; ‌‘बारा गाड्या‌’ची परंपरा

बैलगाडा शर्यतीसह कुस्ती आखाडा रंगला

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: ‌‘खंडोबाच्या नावानं चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार‌’ च्या जयघोषात राहुरी नगरीत ग्रामदैवत खंडोबा महाराजांच्या यात्रेला रविवारी (5 एप्रिल) भक्तिभाव आणि उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेपासूनच संपूर्ण शहर धार्मिक वातावरणाने दुमदुमून गेले होते.

पुणतांबा येथून कावडी घेऊन आलेल्या शेकडो भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत मंदिरात प्रवेश केला. या पवित्र जलाने खंडोबा महाराजांना जलस्नान घालण्यात आले. पहाटे नगरसेवक प्रतीक तनपुरे, अध्यक्ष विलास वराळे व रेखा वराळे यांच्या हस्ते खंडोबा महाराज व म्हाळसा देवीचा महाभिषेक करण्यात आला.

त्यानंतर सकाळी कावड मिरवणुकीतून जलाभिषेकाचा सोहळा पार पडला. सायंकाळी यात्रेतील प्रमुख आकर्षण ठरलेल्या परंपरेनुसार भगत ऋषिकेश शेटे यांनी लहान मुलांनी भरलेल्या बारा गाड्या ओढण्याची अद्भुत किमया साधली. हा थरारक आणि भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. या विधीनंतर यात्रेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

यात्रेनिमित्त पुढील काही दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. सोमवारी बिहाणीमाळा येथे नामवंत मल्लांच्या कुस्त्या रंगल्या, तर बुधवार (8 एप्रिल) रोजी स्टेशन रोड येथे पारंपरिक बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्ती स्पर्धांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आल्याने राज्यभरातील मल्लांचे लक्ष राहुरीकडे लागले आहे.

यावेळी मार्तंड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे, उपाध्यक्ष दिनकर पवार, सचिव सदाशिव शेळके, तसेच यात्रा समितीचे अध्यक्ष विलास वराळे, उपाध्यक्ष तुषार पवार, गौरव तोडमल, खजिनदार अमोल तनपुरे, उपखजिनदार दीपक साळवे, सचिव आकाश येवले, उपसचिव अमोल उंडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याशिवाय नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, तसेच सर्व नगरसेवकांनी यात्रेत सक्रिय सहभाग घेतला.माजी खासदार प्रसाद तनपुरे, डॉ. उषाताई तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, तसेच अरुण तनपुरे यांनी भाविकांना यात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. रात्री ज्योत मिरवणूक, सोंग सोहळे आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे यात्रेला अधिकच रंगत आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

खंडोबा महाराजांची यात्रा ही राहुरीकरांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. यंदा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून धार्मिक व क्रीडा कार्यक्रमांमुळे आकर्षण वाढले आहे. भक्ती, परंपरा आणि उत्सव यांचा संगम असलेली राहुरीची खंडोबा यात्रा यंदाही जल्लोषात रंगली असून, ‌‘जय मल्हार‌’च्या गजरात शहर भक्तिरंगात न्हाऊन निघाले आहे.
-रावसाहेब (चाचा) तनपुरे, मार्गदर्शक यात्रा कमेटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT