Crime Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Pipeline Dispute: पाईपलाईन वादातून करजगावात हिंसक राडा; दोन्ही बाजूंकडून तक्रारी

शेतीच्या पाण्यावरून तुफान संघर्ष; शेतकरी, महिला व आदिवासी नागरिक जखमी

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: शेतीसाठी पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या वादातून तालुक्यातील करजगाव अक्षरशः रणकंदन माजवले. या एकाच घटनेतील दोन्ही बाजूंकडून पोलिसात परस्पर तक्रारी दाखल झाल्या आहेत. या राड्यात शेतकरी, महिला, आदिवासी वस्तीतील नागरिक जखमी झाले आहेत. कत्ती, ब्लेड, लोखंडी रॉड, दगड व लाठ्यांनी एकमेकांच्या जमावावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या थरारानंतर गावात भितीचे सावट पसरले आहे. प्रशासनाच्या गप्प भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पहिल्या तक्रारीनुसार गोविंद भाऊसाहेब कोतकर यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत हद्दीत पाईपलाईन टाकण्यास काही अतिक्रमणधारकांनी विरोध केला. तहसीलदारांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू असताना खंडू देविदास गांगुर्डे, संतोष देविदास गांगुर्डे, सुभाष विश्वनाथ गांगुर्डे, महेश सुभाष गांगुर्डे, किसन सुभाष गांगुर्डे, दत्तात्रय सुभाष गांगुर्डे, गणेश देविदास गांगुर्डे, पार्वताबाई देविदास गांगुर्डे, उषा सुभाष गांगुर्डे आदींनी हे काम थांबवा, अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली. शेतकरी व महिलांवर कत्ती, ब्लेड, लोखंडी रॉड व दगडांनी हल्ला केला. एका महिलेस लज्जास्पद वर्तनास सामोरे जावे लागले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसात तक्रार दाखल केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. जखमींना रुग्णालयात नेताना शोयब पठाण यांची, मोटारसायकल अडवून मारहाण करीत रोकड रक्कम व कागदपत्रे हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दुसऱ्या तक्रारीनुसार खंडू देविदास गांगुर्डे यांनी म्हटले आहे की, गट नं. 28 ही शासनाची गायरान जमीन आहे. अनेक वर्षांपासून आम्ही ती कसत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. पाईपलाईन कामावेळी कागदपत्रे दाखवताना त्यांच्या नातेवाइकाचा मोबाईल हिसकावून प्रवरा नदीत फेकण्यात आला. यानंतर संतप्त जमावाने थेट आदिवासी वस्तीवर सशस्त्र हल्ला केला, असा आरोप त्यांनी केला आहे.

या तक्रारीत सोपान दत्तात्रय कोतकर, आप्पा गोपीनाथ गायके, गोविंद भाऊसाहेब कोतकर, हबीब बालमभाई पठाण, अमोल बाळासाहेब गायके, सचिन अशोक लोंढे, गणेश कोबरणे, शोएब इस्माईल पठाण, विश्राम इम्रानभाई पठाण, बाळकृष्ण ज्ञानेश्वर कोतकर, अनिल बाळासाहेब लोंढे यांच्यासह 35- 40 अनोळखी इसमांविरुद्ध आरोप करण्यात आले आहेत. महिला- पुरुषांना जातीवाचक शिविगाळ करुन, लोखंडी गज, लाकडी दांडे, दगड व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. घरांची तोडफोड झाली आहे. 48 हजार रुपये गहाळ झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या हल्ल्यात 10- 12 नागरिक जखमी झाले आहेत.

गावात तणावपूर्ण शांतता

सध्या करजगावात तणावपूर्ण शांतता आहे. दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असला आहे, परंतू करजगावात पेटलेला वाद नेमका कधी थंड होणार, हा प्रश्न अनुत्तरितचं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT