राहुरी: राहुरी शहरातील राजेश नगरकर या 50 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने आजारपणाला कंटाळून दुपारच्या सुमारास राहत्या घरात नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन, आत्महत्या केली. राजेश धनंजय नगरकर (50, रा. सोनार गल्ली, राहुरी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
राजेश धनंजय नगरकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. (दि. 12 जुलै) रोजी दुपारी 3 वाजता ते हॉटेल मधून घरी गेले. तिसर्या मजल्यावरील रुममधील पंख्याला नायलॉन दोरी बांधून, तिच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. (Latest Ahilyanagar News)
सदर दुर्घटना त्यांच्या पत्नीने पाहिली असता, त्यांनी आरडाओरड केली. परिसरातील श्रेयस लोळगे, राजू बुर्हाडे, सचिन बुर्हाडे, सोमा गुजर आदी तरुणांनी तत्काळ दुर्घटनास्थळी धाव घेऊन, राजेश नगरकर यांना फासावरुन खाली उतरविले. येथील ग्रामीण रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले, परंतू वैद्यकीय अधिकार्यांनी राजेश नगरकर यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग उदावंत, नारायण धोंगडे, स्वप्नील भालेकर, शंकर दाभाडे, सौरभ दुधाडे, मनोज आंबिलवादे आदी तरुणांची रुग्णालय परिसरात मोठी गर्दी दाटली होती. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते व पोलिस नाईक नदीम शेख यांनी माहिती घेतली. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते करीत आहे.