उंबरे: राहुरी तालुक्यातील उंबरेसह अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सिंगल फेज वीजपुरवठा अनियमित आणि अनेकदा रात्रीच्या वेळी पूर्णपणे बंदच असतो. त्यामुळे घरातील पंखा, दिवा, मोबाईल चार्जिंग, पिण्याच्या पाण्याची मोटार सगळेच ठप्प झाले आहे. शेतकरी रात्री अंधारातच दिवस काढत आहे.
सध्या तालुक्यात बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रात्रीच्या वेळेस बिबट्या शेतात, वस्तीवर, गोठ्याजवळ येऊन शेळ्या-मेंढ्या, वासरे, कुत्री यांच्यावर हल्ला करत आहे. अनेक ठिकाणी बिबट्याने माणसांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत.
वीज बंद असल्याने शेतकरी रात्री शेतात जाण्यासाठी घाबरत आहे. गोठ्यातील जनावरे वाचवायची कशी, शेतातील पिके वाचवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. विज असती तर किमान बिबट्या दिसला असता, बॅटरी, दिवा लावून जनावरे वाचवता आली असती. आता अंधारात आम्ही काय करणार?, अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली.
ग्रामीण भागात बिबट्याबरोबरच साप, विंचू यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला आहे. अंधारात शेतात, घराभोवती जाताना साप चावल्याच्या घटना वाढल्या आहेत. तर दुसरीकडे रानडुक्करांनी शेतातील पिकांचा फडशा पाडला आहे.
रात्रीच्या वेळी रानडुक्करांचे कळप शेतात घुसून मका, सोयाबीन, भाजीपाला, ऊस पिकांचे नुकसान करत आहेत. लाईट नसल्याने रात्री शेतात राखण करणेच शक्य होत नाही. शेतकरी रात्रभर जागून काठी वाजवून, आरडाओरडा करून डुक्कर हाकलण्याचा प्रयत्न करतो, पण अंधारात त्यालाही मर्यादा आहेत.
दिवसभर उन्हात काम करायचे, रात्री डुक्कर आणि बिबट्याची राखण करायची, झोपायचे कधी? आम्ही माणसे आहोत की जनावरे? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
राहुरी तालुक्यात यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, बोअरवेल आटल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठीही टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. शेतीसाठी पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिके वाया गेल्याने हातातोंडाशी आलेला घास गमावला आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी महावितरणकडून लाईट बंद करून त्याला आणखी अंधारात ढकलले जात आहे. बिले मात्र वेळेवर आणि वाढीव येत आहेत. बिल नाही भरले तर कनेक्शन तोडण्याची धमकी दिली जाते, पण वीज मात्र वेळेवर दिली जात नाही, असा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या मते, महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करूनही कुणीही दखल घेत नाही. फोन केला तर फोन उचलला जात नाही. लाईट कधी येणार, याचे उत्तर कुणाकडेही नाही. ट्रान्सफॉर्मर जळाला तर आठ-आठ दिवस बदलला जात नाही. तारा तुटल्या तर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनाच पैसे मागितले जातात, असा आरोप केला जात आहे.
महावितरणचे अधिकारी ऑफिसमध्ये बसून आहेत, आणि आम्ही अंधारात बिबट्याशी लढतोय. यांना शेतकऱ्यांच्या जीवाची काहीच काळजी नाही का? असा संताप उंबरे येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
शेगडी, मोटारी चालवू नका
दरम्यान, सध्या सिंगल फेज विजेचे भारनियमन सुरू आहे. रात्री विद्युत मोटारी तसेच शेगडीचा वापर केला जात असल्याने भारनियमन करावे लागते. वीजपुरवठा सुरळीत करायचा असेल तर नागरिकांनी देखील शेगडी, विद्युती मोटारी चालवू नये, असे आवाहन महावितरण विभागाने केले आहे.
अन्यथा ठिय्या आंदोलन
पुढील दोन-तीन दिवसांत सिंगल फेज लाईट सुरू झाली नाही, तर उंबरेसह राहुरी तालुक्यातील शेतकरी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा माजी शिवसेना राहुरी तालुका उपप्रमुख दीपकराव पंडित, सोपानकाका दुशिंग, शरदराव ढोकणे, चारुदत्त हापसे आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.
रात्रीचे भारनियमन नको
उंबरे परिसरातील शिलेगाव रस्ता भागात बिबट्याची दहशत सुरू आहेत. त्यातच रात्री वीज गायब असल्याने शेतकरी दहशतीखाली आहे. दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याला मध्यरात्री बिबट्या दिसला आहे.
तसेच नारायण नामक शेतकरी हा घराबाहेर झोपला असता, बिबट्या त्याच्या उशापासून जात असताना त्याला जाग आली आणि आरडाओरडा करताच बिबट्याने धूम ठोकली. त्यामुळे रात्री भारनियमन करू नये, अशी मागणी छत्रपती प्रतिष्ठानने केली आहे.
अशा आहेत प्रमुख मागण्या
नियमित सिंगल फेज लाईट सुरू करा
रात्रीच्या वेळेस अखंडित वीजपुरवठा द्यावा
जळालेले ट्रान्सफॉर्मर २४ तासांच्या आत बदला
बिबट्या, रानडुक्करांच्या बंदोबस्तासाठी पिंजरे लावा
दुष्काळात शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावी.
निष्काळजी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा.