राहुरी : राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा पारा चांगलाच तापला. तनपुरे गटाच्या विकास आघाडीने भाजप विरोधात मोट बांधली आहे. भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी देत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या मध्यस्थीने बंडाचा पेटलेला वणवा विझविला गेला, तर तनपुरे गटाच्या वतीने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व सभापती अरुण तनपुरे यांनी नव्या जुन्यांचा मेळ घालत बंडखोरी रोखली.
दरम्यान, ‘प्रभाग दोन अ’ च्या उमेदवाराने अपात्र अर्जाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. निकालापर्यंत किंवा 25 तारखेपर्यंत त्या प्रभागातील व्यक्तींना अर्ज माघारीची मुदतवाढ मिळाली आहे.
राहुरी नगरपरिषदेसाठी रणधुमाळी पेटलेली आहे. माजी खासदार प्रसाद तनपुरे, डॉ. उषाताई तनपुरे, सभापती अरुण तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यंदा विकास मंडळाचे रावसाहेब चाचा तनपुरे यांना सोबत घेत विकास आघाडी स्थापन केली. तर देशभरात उधळलेला भाजपच्या विजयाचा वारू पाहता मोठ्या आत्मविश्वासाने जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार डॉ. सुजय विखे व युवा नेते अक्षय कर्डिले यांनी राहुरीच्या नगरपरिषदेमध्ये लक्ष घालत नवयुवकांच्या पाठीवर पाठबळाची थाप देत निवडणुकीत फळी उभारली.