Elections Voting Pudhari
अहिल्यानगर

Rahuri Bypoll Election: राहुरी पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; 374 केंद्रांवर वेबकास्टिंग

निष्पक्ष व निर्भय मतदानासाठी कडक तयारी; ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: राहुरी विधानसभा मतदारसंघात दि. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाने काटेकोर तयारी सुरू केली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज झाली आहे. सर्व 374 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा आहे.

मतदान प्रक्रियेसाठी 598 बॅलेट युनिट, 614 कंट्रोल युनिट आणि 606 व्हीव्हीपॅट यंत्रांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट जोडले जाणार आहे. मतदारसंघात एकूण 3 लाख 33 हजार 183 मतदार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी वर्षा पवार आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अमित पवार यांनी बुधवारी (18) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

नामनिर्देशन प्रक्रिया राहुरी तहसील कार्यालय परिसरातील जुन्या सेतू कार्यालयात पार पडणार असून मतमोजणी लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे होणार आहे. उमेदवारांसाठी अनामत रक्कम खुल्या प्रवर्गासाठी 10 हजार रुपये तर अनुसूचित जाती-जमातींसाठी 5 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा 40 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 6 एफएसटी, 6 एसएसटी, 3 व्हीएसटी आणि 1 व्हीव्हीटी अशी पथके 24 तास कार्यरत राहणार आहेत.

आयपीएस ऋतुराज रवी यांच्याकडे जबाबदारी

राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत, निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी 2013 बॅचचे आयपीएस अधिकारी ऋतुराज रवी (मेघालय कॅडर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे काल सकाळी अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाले आहे. ते लवकरच राहुरी मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत.

निष्पक्ष व निर्भय मतदानासाठी प्रशासन कटिबद्ध निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून प्रत्येक मतदाराला निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना राबवण्यात येत आहे.
वर्षा पवार, निवडणूक निर्णय अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT