voter list Pudhari
अहिल्यानगर

Rahuri Assembly By-Election: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण, अंतिम मतदारयादी जाहीर

३ लाख ३२ हजारांहून अधिक मतदार; पोटनिवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे राहुरीकरांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नगर: राहुरी विधानसभा मतदारसंघाची 3 लाख 32 हजार 952 मतदारसंख्या असलेली अंतिम मतदारयादी शनिवारी (दि.14) प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये 1 लाख 71 हजार 988 पुरुष तर 1 लाख 60 हजार 963 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे आता राहुरीकरांचे लक्ष लागले आहे.

राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची पूर्वतयारी दोन अडीच महिन्यांपूर्वीच निवडणूक आयोगाने सुरु केली. या मतदारसंघात राहुरी तालुक्यातील 64, पाथर्डी तालुक्यातील 38 व अहिल्यानगर तालुक्यातील 24 अशा 126 गावांचा समावेश आहे.

या मतदारसंघात पहिल्यांदा मतदान केंद्रांची पुनर्ररचना करण्यात येऊन 374 मतदान केंद्र अंतिम करण्यात आले आहेत. बहुतांश मतदान केंद्रांवर आता 700 ते 800 मतदार असणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात 1 जानेवारी 2026 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यानुसार 6 जानेवारी 2026 रोजी 3 लाख 31 हजार 364 मतदारसंख्या असलेली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

या प्रारुप मतदारयादीवर 6 ते 24 जानेवारी 2026 या कालावधीत नमुना अर्ज क्रमांक 6 व 8 मिळून एकूण 1 हजार 692 दावे तसेच 4 हजार 602 हरकती निवडणूक प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या प्राप्त हरकतींवर 3 व 4 फेब्रुवारी रोजी सुनावणी प्रक्रिया राबविण्यात आली होती.

या सुनावणीनंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पंकज आशिया यांनी शनिवारी (दि.14) 3 लाख 32 हजार 952 मतदारसंख्या असलेली अंतिम मतदारयादी प्रसिध्द केली आहे. प्रारुप मतदारयादी प्रसिध्द केल्यानंतर या मतदारसंघात 1 हजार 588 मतदारांची वाढ झालेली आहे.

पोटनिवडणुकीसाठी आवश्यक असणारी मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरण, मतदारयादी अंतिम करणे आदींची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे. विद्यमान आमदारांचे निधन झाल्यानंतर सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेतली जात आहे. 17 एप्रिल 2026 रोजी सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT