राहुरी: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू झालेली आहे. स्व.आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी पद रिक्त असल्याने संबंधित पदाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहिर करण्यात आलेली आहे. दि.6 ते 24 जानेवारीपर्यंत हरकती व दावे नोंदविले जाणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अमित पवार यांनी दिली आहे.
तहसीलदार डॉ. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 6 जानेवारी रोजी प्रारुप यादी छायाचित्रासह प्रकाशित करण्यात आलेली आहे. संबंधित मतदार यादीबाबत काही हरकत किंवा दावा दाखल करण्यासाठी दि. 24 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. राहुरी महसूल विभागाच्या निवडणूक शाखेकडे तक्रार किंवा दावा नोंदविता येणार आहे. दावे व हरकतीबाबत दि. 7 फेब्रुवारी रोजी प्रशासनाकडून निर्णय जाहिर केला जाणार आहे. प्रशासनाकडून दावे व हरकती निर्गती दि. 14 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
मागिल सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळ 3 लक्ष 24 हजार 59 इतके मतदार होते. त्यानुसार वाढलेल्या मतदानानुसार 67 नविन मतदान केंद्र नव्याने असणार आहे. पूर्वी 307 मतदान केंद्र असताना आता राहुरी विधानसभा मतदान केंद्रासाठी 374 मतदान केंद्र असणार असल्याचे निवडणूक प्रशासनाने जाहिर केलेले आहे. त्यामुळे वाढत्या मतदानाचा टक्का पाहता पोटनिवडणुकीसाठी राजकीय तर्क वितर्क सुरू झालेले आहे.