Women leadership in Rahuri
राहुरी: राहुरी तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचे आरक्षण मागिलप्रमाणे जैस-थे ठेवून, उर्वरीत 83 गावांच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडती जाहीर करण्यात आल्या. ग्रामीण पट्ट्यातील तब्बल 43 गावांचा गावगाडा हाकण्याच्या चाव्या ‘ति’च्याच हाती गेल्यामुळे राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आता ‘महिलाराज’ दिसणार आहे.
तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये 3 ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण मागीलप्रमाणे कायम ठेवण्यात आले. (गुरूवारी) राहुरी पंचायत समितीच्या डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृहात तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तर, राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार संध्या दळवी व गौण खनिज विभागाचे प्रशांत औटी यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. (Latest Ahilyanagar News)
चिमुरड्याच्या हस्ते ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 11 (6 महिला), अनुसूचित जमातीसाठी 15 (8 महिला), नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 22 (11 महिला), खुल्या प्रवर्गासाठी 35 (18 महिला) अशा एकूण 83 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या सोडती जाहीर करण्यात आल्या. 83 पैकी तब्बल 43 ग्रामपंचायतींमध्ये प्रवर्गानुसार, ‘महिलाराज’ अवतरणार आहे. 40 ग्रामपंचायती प्रवर्गानुसार व्यक्तीसाठी खुल्या करण्यात आल्या आहे.
राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे प्रवर्ग निहाय आरक्षण पुढील प्रमाणेः अनुसूचित जाती (महिला)- खुडसरगाव, आंबी, तांदुळनेर, गणेगाव, मल्हारवाडी, जांभळी. अनुसूचित जाती (व्यक्ती)- वाघाचा आखाडा, गंगापूर, सोनगाव, चिंचाळे, मोमिन आखाडा.
अनुसूचित जमाती (महिला)- कोंढवड, खडांबे बुद्रूक, दवणगाव, सात्रळ, निंभेरे, तुळापूर, तांभेरे, गुंजाळे. अनुसूचित जमाती (व्यक्ती)- कोल्हार खुर्द, कानडगाव, गुहा, वडनेर, बाभुळगाव, राहुरी खुर्द व धामोरी बुद्रूक.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)- चिखलठाण, वळण, केंदळ खुर्द, उंबरे, केसापूर, वरशिंदे, वांबोरी, कात्रड, लाख, पाथरे खुर्द, घोरपडवाडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग (व्यक्ती)- जातप, मुसळवाडी, खडांबे खुर्द, अंमळनेर, म्हैसगाव, देसवंडी, कुक्कडवेढे, मालुंजे खुर्द, पिं प्री अवघड, वाळूंजपोई व रामपूर.
सर्वसाधारण (महिला)- मोकळ-ओहळ, बोधेगाव, संक्रापूर, चांदेगाव, कोपरे, तिळापूर, पिंप्रीवळण, पिंपळगाव फुणगी, ताहाराबाद, कोळेवाडी, चिंचविहिरे, कणगर बुद्रूक, वरवंडी, चेडगाव, तांदुळवाडी, केंदळ बुद्रुक, धानोरे, बारागाव नांदूर. सर्वसाधारण (व्यक्ती)- ब्राम्हणगाव भांड, करजगाव, टाकळीमिया, माहेगाव, मांजरी, मानोरी, सडे, चिंचोली, दरडगाव थडी, वावरथ, डिग्रस, तमनर आखाडा, धामोरी खुर्द, ब्राम्हणी, आरडगाव, शिलेगाव व कुरणवाडी असे आरक्षण जाहीर करण्यात आले.
अनेकांना आनंदाच्या उकळ्या!
आरक्षण सोडतीनंतर अनेक गावांमधील राजकीय इच्छुकांच्या अपेक्षेवर अक्षरशः पाणी फेरले आहे. काही गावांमध्ये अपेक्षित आरक्षण निघाल्यानंतर स्वतःला आगामी सरपंच म्हणून घेत अनेकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्याचे दृश्य दिसले. पंचायत समिती आवारामध्ये आरक्षण सोडत होताना गावगाड्यातील राजकीय नेत्यांची मोठी रेलचेल दिसली.