

Mangalprabhat Lodha on booth strategy
नगर: भारतीय जनता पार्टी आज कार्यकर्त्यांमुळेच खंबीरपणे उभी आहे. कार्यकर्ता आहे तरच पार्टी आणि सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी टाकलेली जबाबदारी व काम मनापासून करून कर्त्यव्य निभावावे. पक्षाची खरी ताकद बूथ रचना असून, जिल्ह्यातील पक्षाची बूथ रचना मजबूत करा. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांनी किमान शंभर घरांशी संपर्क ठेवा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कार्यकर्त्यांना केले.
देशासह महाराष्ट्रास पुढे नेण्यासाठी सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. (Latest Ahilyanagar News)
मंत्री लोढा यांनी अहिल्यानगरमध्ये गुरुवारी (दि.24) भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा व शहरातील प्रमुख पदाधिकार्यांचा मेळावा घेत बूथ रचनेचा आढावा घेतला. यावेळी मंत्री लोढा यांनी प्रमुख पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.
केंद्रातील व राज्यातील भाजपाचे सरकार हे आजपर्यंतचे सर्वात प्रसिद्ध सरकार आहे. त्यामुळे आलेल्या संधीचा लाभ घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील भारत व महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी योगदान द्या, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांनी केले.
यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हध्यक्ष नितीन दिनकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदींसह शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सर्वसमान्य कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेली आहे. कार्यकर्त्यांना बळ देत ते सामाजिक जाणीवेतून काम करत आहेत. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मंत्रालयाच्या योजना राबवण्यासाठी मंत्री लोढा यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे.
मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केले. नितीन दिनकर यांनी आभार मानले. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, शहर जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे, सरचिटणीस महेश नामदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, अशोकराव गायकवाड धनंजय जाधव, विनायक देशमुख बाबासाहेब वाकळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.