Rahul Jagtap Pudhari
अहिल्यानगर

Rahul Jagtap Political Alliance: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जगताप-नागवडे एकत्र; तात्पुरती युती की नव्या राजकीय समीकरणांची नांदी?

राहुल जगताप यांची अनुराधा नागवडेंना साथ; विखे गटाशी जवळीक, कुकडी कारखान्याचा मुद्दा आणि २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात राजकीय चर्चांना उधाण

पुढारी वृत्तसेवा

अमोल गव्हाणे

श्रीगोंदा: जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले मात्र निवडणूक न लढलेले माजी आमदार राहुल जगताप हे जिल्हा बँक निवडणुकीत पूर्णतः सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमनेसामने लढलेले जगताप आणि नागवडे, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एकत्र आले होते. आता जिल्हा बँक निवडणुकीतही त्यांची युती झाल्याचे पाहायला मिळाले.या दोघांचे एकत्र येणे तात्पुरती गरज का दीर्घकालीन राजकीय समीकरण यावर तालुक्यात आता मतमतांतरे सुरू आहेत.

श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण गेल्या चार दशकांपासून नागवडे आणि पाचपुते या दोन केंद्रांभोवती फिरत आले आहे. २०१४ नंतर राहुल जगताप यांनी स्वतःचा सवता सुभा उभा करत या दोन्ही सत्ताकेंद्रा इतकीच स्वतःची ताकद निर्माण केली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राहुल जगताप आणि अनुराधा नागवडे आमनेसामने लढले. ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची झाली. या निवडणुकीत विक्रम पाचपुते यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. अर्थात या निवडणुकीत राहुल जगताप आमदार होणार नाहीत, या उद्देशाने नागवडे लढले अन् घडलेही. तसेच. निवडणुकीत शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षाचे उमेदवारी असूनही त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विधानसभा निवडणुकीतील पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला.

त्यानंतर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही गट एकत्र आले. ही युती विचारांची नव्हती, तर समोरच्या विरोधकाला रोखण्यासाठीची मजबुरीची युती होती. मात्र, राष्ट्रवादीमधील अंतर्गत धुसफूस सुरूच राहिली. परिणामी एकमेकांच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण झाला नाही. त्याचाच परिणाम म्हणून पूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले. जिल्हा बँक निवडणूक लागताच नागवडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटात उडी घेत आपले राजकारण सेफ करण्याचा प्रयत्न केला. विखे यांच्या कोट्यातून नागवडे यांना उमेदवारी जाहीर झाली. सोसायटी मतदारसंघातून माघार घेतलेल्या राहुल जगताप यांनी विखे यांच्याशी जुळवून घेण्यासाठी हीच नामी संधी असल्याचे ओळखत अनुराधा नागवडे यांच्यासाठी मतदारांचा मेळावा आयोजित केला.

त्या मेळाव्यासाठी सुजय विखे यांना आमंत्रित केले होते. या एकाच मेळाव्याने अनेक राजकीय संदेश दिले. जगताप आणि नागवडे यांचे वैर संपले आहे. जगताप यांनी विखे यांच्याशी जुळवून घेतले आहे. जगताप आगामी राजकारणाची काही गणिते सोयीची केली असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा बँकेची ही युती केवळ नागवडे यांच्या विजयापुरती नव्हती, तर पुढील राजकारणासाठी विखे यांच्याशी जुळवून घेण्याची ती एक व्यूहरचना मानली जात आहे. राजकारणात एक पाऊल मागे घेणे हे लाँग टर्मसाठी महत्वाचे मानले जाते, हा युक्तिवाद जगताप यांच्या भूमिकेला लावला जात आहे. मात्र, दुसरी चर्चा अधिक गंभीर आहे. दरवेळी कुकडी सहकारी साखर कारखान्यावर कारवाईची भीती दाखवून जगताप यांना शांत केले जाते का, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित होत आहे. कुकडी सहकारी कारखाना हा केवळ कारखाना नाही, तर श्रीगोंदा तालुक्यातील हजारो शेतकरी, कामगार, वाहतूकदार यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे.

कारखाना अडचणीत आला, तर जगताप यांचे संपूर्ण राजकारण अडचणीत येईल, याची जाणीव विरोधकांना आहे. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत कुकडीचा मुद्दा काढून दबाव आणला जातो, असा आरोप जगताप समर्थक करतात.आज जिल्हा बँकेच्या राजकारणासाठी दबाव आला, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत हीच पुनरावृत्ती झाली तर.. विधानसभा लढायची असेल, तर निर्भयपणे लढावी लागेल, याची खुणगाठ जगताप यांना बांधावी लागणार आहे. राहुल जगताप यांनी आमदार विक्रम पाचपुते यांच्यावर कडी करण्यासाठी दत्तात्रय पानसरे यांना पुढे केले.त्यात ते यशस्वीही झाले राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. आज पानसरे यांना पुढे केले आहे. पानसरे यांना पुढे करून पाचपुते यांना चेकमेट दिला खरा. मात्र आपल्या पदरात काय पडले. हाही प्रश्न जगताप यांच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारा आहे.

या सर्व घडामोडींमध्ये सगळ्यात जास्त संभ्रमात आहे तो खालचा कार्यकर्ता. विधानसभा निवडणुकीत ज्यांच्या विरोधात जीव तोडून प्रचार केला, त्यांच्याचसाठी नगरपालिकेत आणि जिल्हा बँकेत प्रचार करायचा, ही भूमिका कार्यकर्त्याला पचनी पडत नाही. नगरपालिकेत एकत्र येऊनही पराभव झाला होता, आता जिल्हा बँकेत युती यशस्वी झाली. पण ही युती विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकेल का? की विधानसभेला पुन्हा आमनेसामने लढत होईल? यावरही खल सुरू आहे.

जगताप यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने काही गोष्टी सोयीच्या करून घेतल्या असल्या तरी त्या कितपत शाश्वत आहेत याबाबत प्रश्नचिन्ह आहे .आगामी काळात त्यांना शाश्वत आणि स्पष्ट राजकारणावर भर द्यावा लागणार आहे.

जगतापांकडे नवा आराखडा हवा

जिल्हा बँक आणि विधानसभा निवडणुकीची गणिते वेगळी असतात. जगताप यांना पुढील तीन वर्षांच्या राजकारणाचा आराखडा आतापासून तयार करावा लागणार आहे. शेवटी, राजकारणात एक पाऊल मागे घेणे ,कधी -कधी दोन पावले पुढे जाण्यासाठी असते, पण दरवेळी मागे घेतलेले पाऊल पुढे जाण्यासाठी आहे की कायमचे मागे राहण्यासाठी, हे येणारा काळच ठरवेल.

राजकारणात काहीही शक्य

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर अनुराधा नागवडे, डॉ. प्रणोती जगताप, अनुराधा जगताप, अर्चना पानसरे यांनी एकत्र येऊन काढलेला फोटो चांगलाच चर्चेत आला. नागवडे-जगताप यांच्यातील अंतर्गत द्वंद तालुक्यात सर्वश्रूत आहे. बँक निवडणुकीच्या निमित्ताने का होईना जगताप - नागवडे यांना एकत्र येऊन फोटो काढावा लागला. राजकारणात काहीही शक्य अस उगाच म्हणत नाहीत.

नागवडे गटात नवचैतन्य

जिल्हा बँक निवडणुकीत अनुराधा नागवडे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने नागवडे गटात आनंदाचे वातावरण आहे. बँक निवडणुकीच्या निमित्ताने नागवडे यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT