एकरूखे: अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील गटार कामांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेची गंभीर दखल घेत, या कामांना तत्काळ स्थगिती देवून, सुधारित आराखडा सादर करा, असे स्पष्ट निर्देश माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले आहेत. राहाता शहराचा विकास नियोजनबद्ध, सर्वसमावेशक व कुणालाही त्रास न होता व्हावा, या भूमिकेतून डॉ. विखे पाटील यांनी, शहरातील प्रमुख विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करीत सखोल आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, कैलास बापू सदाफळ, नगरसेवक दशरथ तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे, महामार्ग अधिकारी, भाजपा महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.
अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग कामात रस्त्याची उंची सध्याच्या पातळीपेक्षा 600 मिमीपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आला आहे. साईड गटारांची उंची मोठ्या प्रमाणात वाढवली होती. यामुळे रस्त्यालगतची दुकाने, व्यापारी आस्थापना व पेट्रोल पंप बाधित होण्याची भिती व्यक्त होत होती. ही बाब लक्षात घेऊन, डॉ. विखे पाटील यांनी, महामार्गावरील गटारांचे काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश देत, रस्त्याची उंची 600 मि.मी. ऐवजी कमाल 300 मि.मी. पर्यंत ठेवून, गटारासंदर्भात सुधारित आराखडा तयार करा, असे निर्देश महामार्ग अधिकाऱ्यांना दिले. जमिनीखालून आवश्यक खोदकाम करून, गटारे करण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या. या बदलांनुसार तयार होणाऱ्या सुधारित आराखड्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साठणार नाही. रस्त्यालगतचे व्यवसाय, दुकाने व पेट्रोल पंपधारकांना त्रास होणार नाही, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
राहाता शहरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी डॉ. विखे पाटील यांनी, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील साईड गटार कामे, इरिगेशन गेस्ट हाऊस, राहाता पोलिस स्टेशन व ग्रामीण रुग्णालयाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करून, सविस्तर आढावा बैठक घेतली. जलसंपदा मंत्री तथा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जनतेने दिलेल्या जबाबदारीनुसार राहाता शहराचा नियोजित व सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर व नगरसेवकांनी विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आता पाहणी व बैठक पार पडली.
महामार्ग विभागाने आठवड्याभरात सुधारित आराखडा सादर करावा. यासाठी राहाता नगर परिषदेचा ठराव तसेच राष्ट्रीय महामार्गाचा प्रकल्प असल्यामुळे पालकमंत्री विखे पाटील यांचे पत्र जोडण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची अंतिम मान्यता घेण्यात येईल, असे मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. राहाता ते सावळीविर बुद्रूक नाशिक फाटा दरम्यानचे गटार काम सुधारित आराखड्यानुसारचं करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. विखे यांनी राहाता पोलिस स्टेशनच्या सुमारे 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या इमारत कामाची पाहणी केली. ग्रामीण रुग्णालयासाठी इरिगेशनकडून 20 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, या प्रकल्पासाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स संदर्भात नागरिक- व्यापाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या विविध तक्रारी व अवैध बाबींवर पोलिस विभागासोबत संयुक्त पाहणी करण्यात आली. कॉम्प्लेक्स नुतनीकरण प्रस्ताव हाती घेण्यात येत आहे. नियमबाह्य बाबींवर आवश्यक कारवाई केली जाणार आहे, असे यावेळी डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.
विकासकामांत दिरंगाई खपवून घेणार नाही
दोन वर्षांत राहाता शहर औद्योगिक व शहरीकरणाच्या दृष्टीने वेगाने पुढे जाणार आहे. विकासकामांमध्ये दिरंगाई किंवा त्रुटी खपवून घेतल्या जाणार नाहीत. मोठ्या प्रकल्पांचा पाठपुरावा स्वतः करणार आहे. व्यापारी, उद्योजक व नागरिकांना कोणताही त्रास न होता पायाभूत सुविधा उभारण्यावर आमचा ठाम भर आहे, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.