राहाता : आमचा डीएनए शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून टीका करणे सोपे आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी एकतरी कारखाना किंवा उद्योग उभारला का? अशा शब्दात जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.(Latest Ahilyanagar News)
माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, की ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे वक्तव्य होते. वर्षानुवर्षे ग्रामीण भागात कर्ज घेऊन निवडणुका लढवल्या जातात. घेतलेल्या कर्जाची कोणतीही उत्पादकता नाही. यातून तेच पुन्हा कर्जबाजारी होतात. मात्र वक्तव्याचा अर्धाच भाग दाखवून मला शेतकरीविरोधी ठरवल्याच्या मोठ्या वेदना झाल्या. माझ्या चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात कधीही शेतकऱ्यांच्या विरोधात माझी भूमिका किंवा वक्तव्य नाही. राज्यात कृषिमंत्री असताना सुरू केलेल्या असंख्य योजनांची आठवण आणि लाभ आजही शेतकऱ्यांना मिळत असल्याचे सभाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 32 हजार कोटींचे पॅकेज नुसते जाहीर केले नाही, तर त्याची अंमलबजावणी सुरू झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1472 कोटी रुपयांची मदत मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, माझ्या विधानाचा आणि कारखान्याचा काय संबंध? आमचा कारखाना सुरू होऊन 75 वर्षे झाली. उद्धवजींनी एखादा तरी कारखाना सुरू केला किंवा चालवून दाखवला का? टीका करणे सोपेे आहे. शेतकरी हिताचा एखादा उद्योग किंवा किमान बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन दाखवावा असा टोला लगावून उचलली जीभ लावली टाळ्याला एवढेच त्यांचे काम आहे, असे ते म्हणाले.
अडीच वर्षे राज्यात मुख्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली; पण एकही शेतकरी हिताचा निर्णय त्यांनी घेतला नाही. मराठवाड्यात जाऊन हेक्टरी 50 हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती, त्याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला, अशी टीकाही त्यांनी केली.
संघाच्या माध्यमातून शिवसेना संपविण्याच्या झालेल्या आरोपांवर मंत्री विखे पाटील यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यांना भाजपाचे पाठबळ होते हे जगजाहीर आहे. आता किती दिवस तुम्ही शिळ्या कढीला उत आणणार आहात? तुमच्याकडे तुमचे सांगण्यासाठी काहीच राहिले नाही. त्यांच्या घरावर कोण घिरट्या घालतेय मला माहीत नाही, पण ठाकरे स्वतःभोवती घिरट्या घेत असावेत, अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
दरम्यान, नेवासा येथे महायुतीच्या मेळाव्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की नेवासा तालुक्यात विधानसभा निवडणुकीत दाखविलेली एकजूट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दाखवा. तालुक्यातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी औद्यगिक वसाहत निर्माण करणे हेच ध्येय असल्याचे सांगून आ.विठ्ठलराव लंघे यांच्या माध्यमातून विकासाची प्रक्रिया वेगाने पुढे जात आहे. सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आ.विठ्ठलराव लंघे, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, प्रभाकर शिंदे, अब्दुल शेख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.