नगर: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत काल रविवार दि. २८ जून रोजी जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील तब्बल पावणेचार लाख बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी लसीकरण मोहीमेसाठी मायक्रो प्लॅनिंग केला होता.
त्यानुसार, जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र, त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयातही 3032 बूथवर वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका अशा ८१३१ कर्मचाऱी सकाळपासूनच लसीकरणासाठी सज्ज होते. दिवसभरात बूथ, ट्रॉन्झिस्ट आणि मोबाईल पथकाव्दारे 3 लाख 71 हजार बालकांचे लसीकरण झाले.
एकही लाभार्थी वंचित असणार नाही
दि. ३० जूनपासून ग्रामीण भागात तीन, तर शहरी भागात पाच दिवस घरभेटीद्वारे लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यातील बसस्थानके, रेल्वे स्थानके, विटभट्ट्या, बांधकामे, साखर कारखाने, सट्टे, रस्त्यावरील मजूर तसेच लोकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणीही विशेष पथकांकडून डोस पाजण्यात येणार असल्याचे डॉ. नागरगोजे यांनी सांगितले.
ग्रामीण रुग्णालयातही लसीकरण मोहीम
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मागरदर्शनात पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय 1974, ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा 3418, राहुरी 3894, राहाता 2505 आणि शिर्डी 5325 अशा ठिकाणीही 17116 बालकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून साधारणतः पावणेचार लाख बालकांना पोलिओचे लसीकरण करण्यात आले आहे. एकही बालक वंचित राहू नये, यासाठी प्रशासन तत्पर आहे. नागरीकांनीही आपल्या बालकांचे लसीकरण करून सहकार्य करावे.डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.