नगर: काहीसे दाटलेले आभाळ अन् वातावरणात उष्मा असला तरी प्रत्येकाच्या हातातील पुष्पगुच्छांच्या गंधाने वातावरणाला आलेली मंद धुंदी, जिभेवर विरघळणारी नारळाची बर्फी आणि लज्जतदार बटाटेवड्यासोबत चहा-कॉफीचा आस्वाद घेत निघणाऱ्या हास्यविनोदाच्या लकेरी; रंगलेले गप्पांचे फड आणि त्यांना मंद संगीताची साथसंगत... असे भारलेले वातावरण म्हणजे आनंदाची मुक्त उधळणच...
निमित्त होते ‘पुढारी’च्या अहिल्यानगर आवृत्तीच्या एकोणिसाव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि. २७) आयोजित स्नेहमेळाव्याचे. नगर-कल्याण रोड परिसरात शिवाजीनगर येथील जाधव लॉन्स येथे हा सोहळा सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत रंगला... या सोहळ्याला अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांसह संघर्षाच्या वाटेवर स्वार होत यशाची शिखरे सर केलेल्या अहिल्येच्या लेकी आवर्जून उपस्थित होत्या. सर्वांनी ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त ‘पुढारी’ने १९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत प्रकाशित केलेल्या ‘अहिल्येच्या लेकी’ या विशेषांकाचे विशेष कौतुक या सोहळ्यात करण्यात आले. या विशेषांकाचे प्रकाशन महिलांच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या रणरागिणी महिला मंडळाच्या तसेच स्पेशल ऑलिंम्पिक अहिल्यानगरच्या अध्यक्ष धनश्री विखे पाटील, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, माजी महापौर शीलाताई शिंदे व बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, अनिल बोरुडे, राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, मर्चंट बँकेचे अध्यक्ष संजय चोपडा, राष्ट्रवादीच्या माजी शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ, संजय घोगरे, जिल्हा बँकेचे एमडी रावसाहेब वर्पे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीनाक्षी शिवगुंडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
‘पुढारी’चे (पुणे) निवासी संपादक सुनील माळी, रिजनल मॅनेजर (ऑपरेशन अँड मार्केटिंग) हरीश हिंगणे, रिजनल वितरण व्यवस्थापक वैभव जाधव, ‘पुढारी’च्या नगर आवृत्तीचे ब्युरो चीफ संदीप रोडे, शाखा व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे, वितरण व्यवस्थापक प्रमोद गायकवाड, वृत्त संपादक दीपक रोकडे, तसेच श्रीरामपूरचे विष्णू वाघ आदींनी पुढारी परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा स्वीकार केला.
‘पुढारी’वर प्रेम करणारे, पाठबळ देणारे वाचक, जाहिरातदार, वितरक, तसेच विविध शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचारी आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या गर्दीने हा स्नेहमेळावा उत्तरोत्तर रंगत गेला. वर्धापन दिनानिमित्त ‘पुढारी’ शनिवारपासून (दि. २५) रोज प्रसिद्ध करीत असलेल्या ‘अहिल्येच्या लेकी’ या विशेषांकाचे मुक्तकंठाने कौतुक करत, शुभेच्छा देण्यातही कुणीच मागे नव्हते.