प्रशासक राजमुळे जनकल्याण योजना रखडल्या Pudhari
अहिल्यानगर

Parner News: प्रशासक राजमुळे जनकल्याण योजना रखडल्या

पारनेर पंचायत समितीत हिरकणी कक्षात रोजगार हमी!

पुढारी वृत्तसेवा

पारनेर: पारनेर पंचायत समितीमधील हिरकणी कक्षाच्या खोलीत चक्क रोजगार हमी योजनेचे कार्यालय थाटण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने नेमलेल्या हिरकणी कक्ष फक्त कागदावरच असल्याचे दिसून येते. याकडे प्रभारी गटविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

पारनेर पंचायत समितीच्या आवारात हिरकणी कक्ष एका खोलीमध्ये सुरू करण्यात आला. पण तो कक्ष फक्त नावालाच उरला आहे. त्यामध्ये रोजगार हमी योजनेचे कार्यालय गटविकास अधिकारी यांनी थाटले आहे. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होत आहे.  (Latest Ahilyanagar News)

पंचायत समितीत स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष असणे आवश्यक आहे. हिरकणी कक्ष म्हणजे स्तनदा मातांना त्यांच्या बाळाला शांतपणे आणि सुरक्षितपणे स्तनपान करता येईल, अशी जागा. या कक्षात त्यांना योग्य आराम आणि गोपनीयता मिळेल.

स्तनदा मातांना शासकीय कामासाठी किंवा इतर कारणांसाठी पंचायत समिती कार्यालयात येताना स्तनपानासाठी सोयीस्कर जागा उपलब्ध करून देणे. बंधनकारक आहे. या कक्षात आरामदायी खूर्ची, टेबल, पाण्याची सुविधा, तसेच बाळाला आराम करण्याची जागा उपलब्ध असते.

मात्र, पारनेर पंचायत समितीमध्ये यापैकी काहीही सुविधा नसून येथे दुसर्‍या विभागाचे कार्यालय सुरू असल्याचे दिसते. याची वरिष्ठाकडून चौकशी होऊन सर्व सुविधांसह हिरकणी कक्ष सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

प्रभारी गटविकास अधिकारी निष्क्रिय!

पारनेर पंचायत समितीचा कारभार रामभरोसे चालत असल्याबाबत ‘पुढारी’ने वेळोवेळी आवाज उठविला आहे. परंतु त्यात सुधारणा होत नसून, हिरकणी कक्षा सोबतच पंचायत समितीतील विविध विभागात अधिकारी-कर्मचारी सतत गैरहजर राहतात. त्यांची मनमानी होते, याकडे गटविकास अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे.

प्रशासक राजमुळे विकासाला ब्रेक!

ग्रामीण भागाचा गावगाडा पंचायत समितीच्या माध्यमातून चालत असतो. परंतु अडीच वर्षांपासून पंचायत समितीवर प्रशासक राज असल्याने जनकल्याण योजनांना ब्रेक लागला आहे. निवडणुका लांबणीवर पडण्याचा फटका ग्रामीण विकासावर होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT