Coaching Classes Fees Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Coaching Classes: नगरमध्ये खासगी क्लासेसचा ‘धंदा’ तेजीत; पालकांच्या स्वप्नांची होतेय लूट

नीट-जेईई तयारीच्या नावाखाली लाखोंची फी; नियमबाह्य क्लासेसवर नियंत्रणाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नगर: अहिल्यानगर शहरात खासगी क्लासेसची स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. नुकताच दहावी, बारावीचा निकाल लागला आहे. यामध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनविण्यासाठी खासगी क्लासचालक जाळ्यात ओढून, अगदी पालकांना ‌‘स्वप्न‌’ विकत आहेत. या विद्यार्थ्यांची दोन वर्षे ‌’नीट‌’ तयारी करून घेण्यासाठी अक्षरशः अकरावी आणि बारावीच्या दोन वर्षांच्या शैक्षणिक हजेरीची अन परीक्षेचीही जबाबदारी हेच खासगी क्लासचालक उचलत आहेत. याशिवाय, दहावी, बारावीसह जेईई, एमएचटी-सीईटी व अन्य स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही खासगी क्लास गल्लोगल्लीत सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी 12 वी नंतर होणारी नीट परीक्षा द्यावी लागते. मात्र, त्यासाठी अनेक क्लास चालक हे विद्यार्थ्यांची दोन वर्षे तयारी करून घेतात. मात्र, हे करत असताना, त्यांच्याकडे कोणताही परवाना नसतो, पात्र शिक्षक नसतात, आवश्यक सुविधा नसतात, तरीही पैसे कमविण्यासाठी हे ‌‘उद्योग‌’ उभे केले जात आहेत. नगरमध्येही काहींचा अपवाद वगळला तर बहुतांशी खासगी क्लास चालक नियम पायदळी तुडवून शिक्षणाच्या नावाखाली माया गोळा करत आहेत. 10 वी पास झालेले विद्यार्थी हेच खासगी क्लास चालकांचे खरे ‌‘ग्राहक‌’ आहेत. त्यांना सोयीस्कर गळाला लावले जाते.

त्यासाठी ‌‘दहावीनंतर पुढे काय‌’ असे अनेक इन्व्हेंट घेतले जातात. त्यात अगदी सोयीने पालकांना खासगी क्लास चालकांच्या दारात पोहचण्याचे काम ‌‘यंत्रणा‌’ करते. त्यात शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनाही ‌‘कट‌’ दिला जातो, अशी चर्चा आहे. त्या ठिकाणी पालकांना स्वप्ने दाखवली जातात, लाखोंची फी उकळली जाते. हेच विद्यार्थी पुढील दोन वर्षांसाठी खासगी क्लास चालकांचे ‌‘कुरण‌’ असतात, त्यात नवीन पुस्तके, वह्या, इतर साहित्य सामग्रीतही ‌‘हातचा‌’ राखून ठेवला जातो. त्यामुळे पालकांच्या भावनांशी खेळून त्यांची लूट केली जाते. अनेकांकडे शॉप ॲक्ट लायसेन्स नाही, त्यांची नोंदणी नाहीत, त्यांच्या शुल्कावर नियंत्रण नाही, त्यामुळे खासगी क्लास चालक ‌‘सुसाट‌’ आहेत. त्यांच्यावर अंकुश लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्याची मागणी होताना दिसत आहे. त्यांचा प्रत्यक्षात निकाल किती आहे, याचीही शहानिशा होताना दिसत नाही.

विद्यार्थ्यांचा डेटा कुठून पोहोचतो?

दहावीच्या विद्यार्थ्यांची खासगी क्लास चालकांना परीक्षा घेण्यासाठी परवानगी कोण देते, हा प्रश्न आहेच. विशेष म्हणजे परीक्षा झाल्यानंतरच हा डाटा क्लास चालकांना 20-25 हजारांना पोहच केला जातो. एका क्लास चालकानेच मला 15 हजारांना हा डेटा देण्याची ऑफर आली होती, मात्र, माझ्याकडे ही माहिती अगोदरच होती, असे खासगीत सांगितले.

लाखोंची फी, तरीही विद्यार्थ्यांची अवहेलना

ज्या क्लासला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्याकडे वसतिगृह नाही, मात्र खासगी फ्लॅट भाडोत्री घेऊन त्या ठिकाणी त्यांनी मुला-मुलींची व्यवस्था केली आहे. लाखो रुपये घेऊनही त्या ठिकाणी अनेक समस्या असतात. अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते नाष्टा, जेवणाची समस्याही प्रकर्षाने जाणवते. याशिवाय मुलींच्या सुरक्षेचाही प्रश्न आहेच. गेल्या आठवड्यातच कोहिनूर परिसरातील एका नामांकित क्लासमधील एक मुलगी ‌‘मला टार्गेट केले जाते‌’, असा आरोप करून अक्षरशः रडू लागली होती. त्यामुळे ही बाब चिंताजनक आहे. सर्व माहिती असूनही मुलांच्या भविष्याचा विचार करून पालक बोलत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनीच गांभीर्याने याकडे पाहण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT