संगमनेर: सध्या प्रवरा नदी वाहत असून अनेक लहान मुले तरुण पोहण्याचा आनंद घेत आहे. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी गंगामाई घाटावर गेलेल्या एक तरुण प्रवरा नदीत बुडाला. त्याला उच्चारासाठी खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.ही घटना गुरुवारी दुपारी घडली. अर्जुन बलवे (वय 21 रा. घुलेवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. (Latest Ahilyanagar News)
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवरा नदीला पाणी असल्याने अनेक तरुण नदीत पोहण्यासाठी येत आहेत. सध्या नदीवर तरुणांची गर्दी दिसत असून गुरुवारी काही तरुण गंगामाई घाटावर पोहण्यासाठी गेले होते. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रवरा नदी पात्रात गंगामाई घाटावरील विहिरीजवळ काही तरुण पोहण्यासाठी गेले होते.
याच वेळी एका तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याच्या सोबत असलेले मित्रांनी आरडाओरडा केली. त्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी जाणता राजा प्रतिष्ठान प्राणी मित्र, सर्पमित्र सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश नरवडे व अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष पै. विकास जाधव व ओमकार नरवरे व इतर लोकांनी मदतकार्य केले. काहीवेळात पाण्यात बुडणार्या तरुणाला बाहेर काढण्यात आले.
बाहेर काढल्यानंतर श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न केला. एका रिक्षातून तातडीने उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता मृत्यू घोषित करण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवरा नदी पात्रात गंगामाई घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रवरा नदीला पाणी असल्याने तरुणांनी नदीत पोहण्यासाठी जाऊ नये.- रवींद्र देशमुख, पोलिस निरीक्षक