राहुरी : राहुरी शहरातील नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील जिजाऊ चौक परिसरात पडलेले मोठ-मोठे खड्डे आणि साठलेले पाणी, यामुळे अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवाशी प्रवास करीत आहेत. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध रोष उसळला आहे. या बिकट पार्श्वभूमीवर माजी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले. या राष्ट्रीय महामार्गाच्या बिकट परिस्थितीचा निषेध नोंदवित, तनपुरे यांनी बुधवारी जिजाऊ चौकात उतरून प्रशासनाला जागे करण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबून रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून, त्यांनी ठेकेदारासह महामार्ग अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाविरुद्ध प्रखर शब्दांत टीका केली. (Latest Ahilyanagar News)
यावेळी तनपुरे म्हणाले की, राहुरीसारख्या वाढत्या शहरात राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाला. ही लाजिरवाणी बाब आहे. येत्या आठवड्याभरात या रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास आम्ही ‘राहुरी बंद’ करू. आम्हाला तुरुंगात घातले तरी चालेल, पण या रस्त्याचा प्रश्न सुटल्याशिवाय आता शांत बसणार नाही, असा सज्जड इशारा देत, त्यांनी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून विचारणा केली की, ‘तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का. काम सुरू का होत नाही. आणखी किती नागरिकांचे जीव गेल्यावर तुम्ही जागे होणार आहात,’ अशी विचारणा करुन, त्यांनी संताप व्यक्त केला.
कागदी होड्या पावसाच्या पाण्यात सोडून, माजी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे व उपस्थितांनी संताप व्यक्त करून, प्रशासनाविरुद्ध तीव्र शब्दात निषेध नोंदवला. हा विकास नव्हे, विनोद आहे, असे सांगत प्रशासनाच्या कामकाजावर त्यांनी रोष व्यक्त केला.
आंदोलनात मोठ्या संख्येने राहुरीकर नागरिक, व्यापारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. माजी नगरसेवक सागर तनपुरे, राजेंद्र बोरकर, रविंद्र आहेर, बाळासाहेब उंडे, नामदेव पवार, रविंद्र तनपुरे, मयुर बोरकर, अमर पवार, प्रदीप भुजाडी, एकनाथ बडे, दादाभाऊ रोकडे, विजय उंडे, प्रकाश तनपुरे, रफिक शेख, ज्ञानेश्वर जगधने, गणेश कोहकडे, सचिन वराळे, सचिन तनपुरे यांच्यासह नागरिकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर गेल्या काही आठवड्यांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. खड्ड्यात वाहन उलटणे, दुचाकीस्वार जखमी होणे, मालवाहू वाहनांचे अपघात सुरुच आहेत. यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत.
अनेक कुटुंबिय जखमी- मृत व्यक्तींच्या वेदनेने हळ-हळत आहेत. प्रशासन मात्र थंड प्रतिसाद देत आहे. परिणामी नागरिकांचा रोष शिगेला पोहोचला आहे.
राहुरी शहरात अपघात, खड्डेच- खड्डे व चिखलामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने आता तातडीने रस्त्यांची दुरुस्ती सुरू न केल्यास राहुरी बंद आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचा रोष रस्त्यावर उमटणार, हे निश्चित आहे.
येत्या आठवड्यात अहिल्यानगर-मनमाड महामार्गाची डागडुजी करा, अन्यथा राहुरीतील जिजाऊ चौकात रस्तारोको आंदोलन करणार आहे. जनता आता बोलायला नव्हे, तर अगदी रस्त्यावर उतरायला तयार आहे, असा सणसणीत इशारा माजी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनाला दिला आहे.