राहुरी: कार्यकर्ता मेळावा अटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा थेट तनपुरे वाड्यावर धडकला. तेथे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचे स्वागत केले. तनपुरे कुटुंबियांशी अर्धा तास झालेल्या चर्चेनंतर अजितदादांनी माजी मंत्री तनपुरे यांना पक्षात येण्याची साद घातली. आता तनपुरे कोणता निर्णय घेतात, त्यातून राहुरीच्या राजकारणात भूकंप करतात की कसं? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
राहुरी बाजार समितीच्या शेतकरी भवन व उपहार गृह प्रारंभ तसेच कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी राहुरीत आले होते. तेथून ते तनपुरे वाड्यात गेले. तेथे सभापती अरुण तनपुरे, माजी खा. प्रसाद तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व डॉ. उषाताई तनपुरे यांच्याशी दिलखुलास चर्चा केली. (Latest Ahilyanagar News)
अजितदादांनी प्रसाद तनपुरे यांच्याशी आपुलकीने संवाद साधत स्वास्थ्य तसेच राजकीय जीवनाबाबत चर्चा केली. स्नेहभोजनानंतर अर्धा तास तनपुरे कुटुंबियांशी संवाद साधत अजितदादांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, पवार-तनपुरे यांच्या स्नेहभेटीनंतर राजकीय वर्तृळामध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हाती घड्याळ बांधली जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.
प्राजक्त हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीात प्रवेश करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी यापूर्वीही अनेकदा केले आहे. रविवारी दादांनी पुन्हा प्राजक्त यांना साद घातल्याचे सभापती अरुण तनपुरे यांच्या घरातील फोटोसेशनमधून समोर आले.
सभापती तनपुरे यांचा पक्षप्रवेशावेळच्या फोटोकडे एकटक पाहत उपमुख्यमंत्री पवार यांनी तटकरेंच्या जागी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हवे होते, अशी मिश्किल टिप्पणी करताच वाड्यात एकच हशा पिकला. त्यानंतर अर्धा तास तनुपरे कुटुंबिय व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा झाली. चर्चेमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल होण्याबाबत पुन्हा साद घातली गेल्याची चर्चा रंगली.
संस्कृती जोपासत पाहुणचार केला - माजी प्राजक्त तनपुरे
पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आल्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी, ‘मी राष्ट्रवादी शरद पवार गटातच असल्याचे जाहिर केलेले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार घरी आल्यानंतर संस्कृतीचे पालन करून त्यांचे स्वागत केले. त्यांनी आपुलकीनी संवाद साधला. मी कोणतीही वेगळी राजकीय भूमिका घेतलेली नसल्याचे स्पष्टीकरण दिले.