जामखेड: मोकाट जनावरांचा नागरिकांना होणारा त्रास, तसेच नगरपरिषद हद्दीतील शेतीपिकांचे होणारी नासाडी,याबाबत नगरपरिषदेस वेळोवेळी निदर्शनास आणून देखील या जनावराचा बंदोबस्त करण्यात आला नाही. त्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष दिनेश राळेभात यांच्या नेतृत्वाखाली ही मोकाट जनावरे जामखेड नगरपरिषदेच्या दारात बांधत आंदोलन करण्यात आले.
जामखेड शहरात सध्या मोकाट जनावरे, मोकाट कुत्री व वराहांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सदरचे जनावरे हे रस्त्याच्या मध्यभागीच बसतात. त्यामुळे अनेक वेळा अपघात होत असून या घटनेत जनावरे व वाहनचालक जखमी झाले आहेत. मोकाट जनावरांवर बरोबरच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. वराहांचा देखील त्रास शहरातील नागरिकांना होत आहे. (Latest Ahilyanagar News)
तसेच नगरपरिषद हद्दीतील गावालगत असलेल्या जमिनी मधील उभ्या पिकांचे ही जनावरे नासाडी करीत आहेत. त्यामुळे गावालगतच्या शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्यांन भरपाई देण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने काही दिवसांपूर्वी जामखेड नगरपरिषदेस निवेदन देऊन या मोकाट जनावरांचा बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र, वेळोवेळी सांगूनही नगरपरिषदेकडून दखल घेण्यात आली नाही. येत्या चार दिवसांत मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास प्रहार जनशक्ती स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यानंतर जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी निवेदन दिले. शहरातील मोकाट जणवरांचा बंदोबस्त करणे मोकाट कुत्री व वराह पकडण्यासाठी तसेच त्यांचे निर्बिंजीकरण करणे व लसीकरण करणे यासाठी निविदा काढली असून लवकरच निवेदनानुसार कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. तसेच येत्या आठ दिवसांत मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे लेखीपत्रात म्हंटले आहे. लेखीपत्र मिळाल्यानंतर आंदोलन दोन तासानंतर मागे घेण्यात आले.
आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले, प्रहार तालुकाप्रमुख नय्युम सुभेदार, प्रहार शहराध्यक्ष दिनेश राळेभात, प्रहार युवक तालुकाप्रमुख प्रमोद खोटे, दिव्यांग तालुकाध्यक्ष सचिन उगले, शहर संघटक विकास राळेभात, जवळा गटप्रमुख राहुल भालेराव, शेतकरी अमोल राळेभात, सतीश राळेभात, रवींद्र परदेशी, ठेकेदार विकास राळेभात, गणेश राळेभात, संदेश राळेभात, विनोद राळेभात बंडू उगले, शिवाजी भोसले उपस्थित होते.