शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी ‘प्रहार’ रस्त्यावर; राहुरीतील नगर-मनमाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन Pudhari
अहिल्यानगर

Prahar Protest: शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी ‘प्रहार’ रस्त्यावर; राहुरीतील नगर-मनमाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन

प्रहार क्रांती संघटनेने राज्यभरात आंदोलन सुरू केले असताना राहुरीतही कडू यांच्या आंदोलनाला पाठबळ मिळाले.

पुढारी वृत्तसेवा

Prahar protest for loan waiver

राहुरी: अधिवेशनातून कर्जमाफीची अपेक्षा होती. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी दिलेले कर्जमाफीचे खोटे आश्वासन पाहता राज्यात शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढत्या. परंतु गांभीर्य न बाळगता कृषी मंत्रीच अधिवेशनात जंगली रमीच्या डावात रंगल्याचे पाहून सत्ताधार्‍यांनी शेतकर्‍यांचा सर्वाधिक अपमान केला.

शेतकरी बच्चू कडू व राजू शेट्टी मागे एकवटले आहे. एकहाती सत्तेचा रंग चढलेल्या राज्य शासनाला जाग आणण्यासाठी आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिला. (Latest Ahilyanagar News)

शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, पेरणी ते कापणी खर्च एमआरइजीएस अंतर्गत मिळावे, हमीभाव मिळावा, दिव्यांग व्यक्तीला 6 हजार रुपये मानधन व घरकूल लाभ मिळावे आदी मागण्यांसाठी राज्यामध्ये बच्चू कडू यांनी आंदोलन हाती घेतले.

प्रहार क्रांती संघटनेने राज्यभरात आंदोलन सुरू केले असताना राहुरीतही कडू यांच्या आंदोलनाला पाठबळ मिळाले. शेतकरी संघटनेचे मोरे, प्रकाश देठे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे, तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे, आप्पासाहेब ढूस, रासपचे नानासाहेब जुंधारे, अशोक तुपे, विलास वराळे, गोरख उंडे आदींच्या मार्गदर्शनात नगर मनमाड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोरे यांनी शासनाच्या कृषी विरोधी धोरणांबाबत टिका साधली. बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे राजू शेटे यांनी शेतकरीहितार्थ आंदोलन हाती घेतलेले आहे. राज्यात सत्ताधार्‍यांना जागा दाखविण्यासाठी शेतकर्‍यांनी वज्रमुठ बांधावी.

प्रहारचे जिल्हाध्यक्ष घाडगे यांनीही शासनाच्या शेतकरी विरोधी भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. प्रकाश देठे यांनी सांगितले की, इंग्रजांच्या नितीप्रमाणेच केंद्र व राज्य शासन कार्यरत आहे. फोडा आणि राज्य करा याप्रमाणे जाती धर्म तसेच भाषेबाबत गट निर्माण केले जात असल्याचा आरोप केला.

याप्रसंगी सुरेशराव लांबे, आप्पासाहेब ढूस यांनी आपले मनोगत व्यक्त करीत कडू यांच्या आंदोलनाला राहुरी पाठींबा असल्याचे सांगितले. आंदोलनावेळी सचिन साळवे, सलीम शेख, योगेश लबडे, वेणूनाथ आहेर, सचिन साळवे, जुबेर मुसानी, किशोर जाधव, संजय देवरे, दत्तात्रय खेमनर, दत्तात्रय येवले, यासिन इनामदार आदींसह शेतकरी व दिव्यांग बंधू उपस्थित होते. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांन निवेदन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. नगर मनमाड रस्त्यावर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.

शेतकर्‍यांनी एकत्र येण्याची गरज!

आंदोलनात सत्ताधार्‍यांच्या मनमानी विरोधात तीव्र पडसाद उमटले. मंत्रालयात हाणामारी, लोकप्रतिनिधीकडून कॅन्टीनमध्ये मारहाण, मंत्र्यांच्या कुटुंबियांच्या नावे डान्सबार, लोकप्रतिनिधीकडून शिविगाळ व मारहाणीची खुलेआम धमकी असे प्रकार घडूनही साधी कारवाई होत नाही. सत्तेच्या धुंदीत असलेल्या राज्यकर्त्यांची नशा उतरविण्यासाठी शेतकर्‍यांनी एकत्र यावे, असे आवाहन आंदोलनावेळी करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT