

कर्जत: राशीन येथे दोन समाजात निर्माण झालेल्या वादावर गुरुवारी (दि. 24) कर्जत तहसील कार्यालयामध्ये सायंकाळी 6 वा. तहसीलदार गुरू बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता समिती बैठकीत सर्व मान्य तोडगा काढण्यात आला.
या वेळी पोलिस निरीक्षक सोपानराव शिरसाट, गटविकास अधिकारी सूर्यवंशी, बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाघचौरे, राजेंद्र देशमुख, श्याम कानगुडे, शाहूराजे राजेभोसले, विजय मोढळे, माऊली सायकर, पुंडलिक सायकल, राम कानगुडे, डॉ. विलास राऊत आदी उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
पत्रकार परिषदेमध्ये राजेंद्र देशमुख म्हणाले की, राशीन हे जगदंबा देवीचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या नागरिकांना मान आहे. काही दिवसांपूर्वी गैरसमज होऊन दोन समाजात तेढ निर्माण झाली होती. परंतु आज दोन्ही समाजातील सर्व प्रमुख मंडळी, युवक यांनी समजूतदारपणाची भूमिका घेतल्याने वाद मिटवला.
या वेळी श्याम कानगुडे, विजय मोढळे, माऊली सायकर, डॉ. विलास राऊत यांनी पुढील काळामध्ये सर्वजण एकत्र येऊन एकोप्याने राहणार असल्याचे सांगितले. राशीन परिसरात रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेले झेंडे काढून रस्त्याकडेला लावण्याचा निर्णय या वेळी सर्वानुमते घेण्यात आला. डॉ. विलास राऊत यांनी, क्रांतिसूर्य महात्मा फुले फाउंडेशनतर्फे आज जो बंद पुकारण्यात आला होता तो स्थगित करण्यात आल्याचे सांगितले.