नगर: महापालिकेची प्रारूप रचना प्रसिद्ध करण्यात आली. नव्या रचनेत शहरातील जवळपास सर्वच वार्डात तोडफोड करण्यात आली आहे. माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर मिस्टर अनिल शिंदे, माजी गटनेते तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, निखील वारे, अविनाश घुले, धनंजय जाधव, शीतल जगताप यांच्या सोईस्कर वार्डरचना झाल्याचे दिसून येते.
दुसरीकडे भाजपचे माजी शहराध्यक्ष भैय्या गंधे, ठाकरे सेनेचे योगीराज गाडे यांची मात्र गोची झाल्याचे दिसते. नव्या वार्डरचनेमुळे माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांना नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यांच्या पारंपरिक वार्डाची तोडफोड झाल्याने ते माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या 7 नंबर वार्डातून लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते. (Latest Ahilyanagar News)
मध्य शहरात ठाकरे सेनेचे वर्चस्व मानले जात होते. मात्र मध्य शहराचा भाग चार वार्डाला विभागून जोडला गेल्याचे दिसते. केडगावचे 16 आणि 17 नंबरचे वार्ड तसेच आ. संग्राम जगताप यांचे निवासस्थान असलेला 14 आणि माजी महापौर मिस्टर अनिल शिंदे यांचे वार्ड काही अपवाद वगळता मात्र जवळपास जुनेच असल्याचे दिसते.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यातील बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, दिलीप सातपुते, अनिल शिंदे, सचिन जाधव यांच्या वार्डाला नव्याने काही भाग जोडले गेले असले तरी ते सुरक्षित मानले जातात.
लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी विरोधी काम केल्याची चर्चा झडली त्यांचे ‘करेक्ट कार्यक्रम’ झाल्याचे नव्या वार्डरचनेवर नजर मारता निदर्शनास येते. विशेषत: ठाकरे सेनेसाठी नवी वार्डरचना अत्यंत क्लिष्ट असल्याचे दिसते. मुकुंदनगर वगळता झेंडीगेट, कोठला या मुस्लिम बहुल भागात मोठी तोडफोड झाल्याचे नव्या रचनेतून समोर आले आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर तसेच माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांच्या 1 नंबर वार्डाला नागापूरचा भाग नव्याने जोडण्यात आला आहे. तर पूर्वीचा गावडे मळ्याची पूर्व बाजू, लेखानगर, संचारनगर हा भाग तोडला असून तो दोन नंबर वार्डाला जोडण्यात आला आहे.
भाजपचे सरचिटणीस निखील वारे यांच्या दोन नंबर वार्डाची दिशा नव्या रचनेत बदलण्यात आली आहे. पूर्व-पश्चिमऐवजी आता उत्तर-दक्षिण असा त्यांचा वार्ड असणार आहे. गावडे मळाची पूर्व बाजू, लेखानगर, हा भाग वारे यांच्या वार्डाला नव्याने जोडला गेला आहे.
विराज कॉलनी, यशवंत कॉलनी, तारकपूर, गोविंदपुरा व फकिरवाडा तीन नंबरमधून तोडून नव्याने स्वतंत्र पाच नंबर वार्ड तयार करण्यात आला आहे. तीन नंबर वार्डाची जवळपास नव्यानेच फेररचना झाल्याचे दिसून येते. प्रकाशपूर, महापालिका कार्यालय, शिला विहार, सहकारनगर, प्रोफेसर कॉलनी, सिव्हील हडको हा भाग तीन नंबरला जोडला गेला आहे. मुकुंनगरचा स्वतंत्र चार नंबर वार्ड निर्माण झाला आहे.
पाच नंबर वार्ड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकापासून (भिस्तबाग चौक), श्रमिकनगर, वैदुवाडी, प्रेमदान हडको, ते सिव्हील हडकोतील गणेश चौक, पोस्ट कॉलनी, प्रेमदान चौक रस्त्याने सावेडीतील सर्वे नंबर 6 डिपी रोडने वैदुवाडी आणि तेथून भिस्तबाग चौकापयर्ंत सहा नंबर वार्डाची व्याप्ती पसरली आहे.
माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या 7 नंबर वार्डाचीही तोडफोड झाल्याचे दिसते. महालक्ष्मी उद्यान, नाना-नानी पार्क, बोरुडे मळा, जाधव मळा हे नवीन भाग वाकळे यांच्या वार्डाला नव्याने जोडण्यात आले आहे.
माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्याही 8 नंबर वार्डात फेरबदल झाले आहेत. नालेगावचा भाग तोडून त्यांना गांधीनगर नव्याने जोडण्यात आले आहे. मनमाड रोडची डावी बाजूपासून ते गांधीनगर, बोल्हेगाव असा त्यांच्या वार्डाचा पसारा असणार आहे.
माजी महापौर मिस्टर संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांची मात्र नव्या वार्डरचनेत डोकेदुखी वाढल्याचे चित्र समोर येत आहे. सिद्धार्थनगर, खाकीदास मठ, नीलक्रांतीमधील हरिजन वस्ती हा भाग 9 नंबर वार्डाला नव्याने जोडण्यात आला आहे.
माजी नगरसेवक सचिन जाधव आणि धनंजय जाधव यांच्या वार्डाची सरमिसळ करण्यात आल्याचे दिसते. सचिन जाधव यांच्यासाठी तोफखाना व बागडपट्टी तर धनंजय जाधव यांच्यासाठी एसटी वर्कशॉप, कोठला, मंगलगेट, हवेली हा भाग नवखा असणार आहे.
माजी सभापती गणेश कवडे यांच्या 11 नंबर वार्डाला आडतेबाजार, रामचंद्र खुंट, नवी पेठ, एमजी रोड, कापड बाजार, जुना दाणे डबरा यासह झेंडीगेटचा काही भाग नव्याने जोडला गेला आहे. कवडे यांच्यासोबतच माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्यासाठी नवी वार्डरचना डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम यांच्या 12 नंबर वार्डाची तोडफोड झाल्याचे दिसून येते. नालेगावातील तांगे गल्ली व झेंडीगेटचा काही भाग नव्याने या वार्डाला जोडला गेला आहे.
माजी नगरसेवक अविनाश घुले यांच्या 13 वार्डात मोठे फेरबदल झाले. काळू बागवान गल्ली, तापकिर गल्ली, सराफ बाजार, पारशाखुंट व झेंडीगेट भाग त्यांच्या वार्डातून वगळण्यात आले आहे. माळीवाड्याचा काही भाग, नवीन टिळक रस्ता, पटेलवाडी, स्टेशन रोडचा पूर्ण भाग चाणक्य चौकापर्यत कोंबडीवाला मळा, सुगंधी चाळ त्यांना नव्याने जोडण्यात अला आहे. घुले यांच्या वार्डातून तुटलेला भाग हा संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांच्या 12 नंबर वार्डाला नव्याने जोडण्यात आले आहेत. नालेगावची तांगे गल्ली, नालबंद खुंट, जुना कापड बाजार असा नवीन भाग बोराटे, कदम यांच्या वार्डाला जोडण्यात आला आहे.
माजी उपमहापौर गणेश भोसले, आमदार मिसेस शीतल जगताप हे प्रतिनिधित्व करत असलेल्या 14 नंबर वार्डात फारसा बदल झालेला नाही. उलट त्यांच्या सोईचा वार्डरचनेत पडल्याचा योगायोग दिसून आला. माजी महापौर मिस्टर अनिल शिंदे, माजी सभापती सुवर्णा जाधव यांचे वार्ड मात्र सेफ राहिल्याचे दिसून येते.
केडगावात किरकोळ बदल
केडगावात 16 आणि 17 असे दोन वार्ड आहेत. या वार्डात किरकोळ बदल वगळता जैसे थे परिस्थिती असल्याचे दिसून येते. शिंदे सेनेचे नेते दिलीप सातपुते यांनी 16 नंबर, तर भाजपचे मनोज कोतकर यांनी 17 नंबर वार्डातून लढण्याची तयारी सुरू केली आहे. कोतकर यांच्या वार्डाला स्टेशन रोडचा काही भाग नव्याने जोडण्यात आला आहे. सातपुते यांच्या जुन्या वार्डातील भूषणनगरचा काही भाग वगळून केडगाव गावठाण हा भाग नव्याने जोडण्यात आला आहे.
15 सप्टेंबरपर्यंत हरकती स्वीकारणार
महापालिकेची प्रारूप प्रभागरचना महापालिका कार्यालयात तसेच महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. या प्रारूप प्रभागरचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत महापालिका कार्यालयातील निवडणूक शाखेत अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात नागरिकांना हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. हरकती वा सूचना दाखल करणार्या व्यक्तींना सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
हरकती दाखल करणार: किरण काळे
महापालिकेची प्रारूप प्रभागरचनेचा सखोल अभ्यास करून आवश्यक ठिकाणी हरकती घेणार असून सूचना मांडणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी सांगितले.
मुकुंदनगर एकगठ्ठा तर झेंडीगेटचे चार तुकडे!
नव्या प्रभाग रचनेत मुस्लिम बहुल मुकुंदनगर हा भाग एकत्रित ठेवण्यात आला आहे. म्हणजे या भागातून नगरसेवक होण्यासाठी मुस्लिम उमेदवारांमध्येच झुंज पाहावयास मिळणार आहे. पूर्वीचा फकिरवाडा मुकुंदनगरपासून तोडून तो पाच नंबर वार्डात समाविष्ट करण्यात आला आहे. शहरातील दुसरा मुस्लिम बहुल भाग म्हणून झेंडीगेटकडे पाहिले जाते. हा भाग मात्र चार वार्डांत विभागून टाकत पूर्णत: मोडतोड केल्याचे दिसते. झेंडीगेट परिसर चार वार्डातून विभागून जोडला गेला आहे. झेंडीगेट भाग 10, 11, 12 आणि 13 नंबर जोडून तेथील ‘त्यांचे’ वर्चस्व मोडीत काढल्याचे दिसून येते.