संगमनेर : तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोडतीनंतर आता 73 ग्रामपंचायतींवर महिला राज असणार आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा अनेक ग्रामपंचायतीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची एक हाती सत्ता असली तरी तालुक्यात सत्तांतर झाल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत संघर्ष पाहायला मिळणार का? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
संगमनेर तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व असून आश्वी विभागातील 28 गावे राहाता मतदार संघाला, तर पठार भागातील घारगाव, बोटा परिसरातील गावे अकोले मतदार संघाला जोडण्यात आली आहेत. गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत. यातच अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपत आल्याने आरक्षण सोडतीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते.
तालुक्यात 174 ग्रामपंचायती असून नुकतेच सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण गट व महिलांसाठी राखीव अशा सर्वच सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. या आरक्षण सोडतीत अनुसूचित जातीसाठी 11 गावे, अनुसूचित जमातीसाठी 24 गावे, इतर मागासवर्गीयासाठी 39 गावे तर सर्वसाधारण गटासाठी 70 गावांचे सरपंच पद आरक्षित झाले आहे.
काल शुक्रवारी (दि. 25) 73 ग्रामपंचायतीत महिलांसाठीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात गुंजाळवाडी, निमगाव जाळी, चंदनापुरी, सोनोशी, आश्वी, कुरण आदिंसह इतर महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर संगमनेर तालुक्यातील निमोण, जोर्वे, कोल्हेवाडी, धांदरफळ, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, तळेगाव दिघे, कोठे कमळेश्वर, सोनोशी, पारेगाव, घारगाव, बोटासह इतर काही ग्रामपंचायतीचे राजकीय समिकरण बदलणार आहे. आश्वी महसूलमध्ये 28 गावांत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर पठार भागातील घारगाव बोटा परिसरात आमदार डॉ.किरण लहामट यांचे काही प्रमाणात वर्चस्व दिसून येते.
संपूर्ण तालुक्याचा विचार करता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची अजुनही अनेक ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता कायम आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, अजित पवार गट, शिवसेना उबाठा गट, एकनाथ शिंदे गट, भाजपा, मनसे सह इतर कोणत्याही राजकीय पक्षाचे फारसे प्रतिनिधीत्व दिसून येत नाही. दरम्यान, नव्याने आमदार झालेले अमोल खताळ आता आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत कशाप्रकारे राजकारण करतात. याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या अनेक वषार्ंपासून निवडणुकाच न झाल्याने राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व इच्छुकांमध्ये आता ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहे. या निवडणुकीत तरुण इच्छुक उमेदवार रिंगणात उतरणार आहे. महिला सरपंच पदाचे आरक्षणाची संख्या पाहता त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतीवर आता महिलांना संधी मिळणार आहे.
मात्र विधानसभेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याने त्यांना यापुढील राजकारण अधिक काळजीपूर्वक हाताळावे लागणार आहे. नुकतीच सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ही थोरातांसाठी मोठी जमेची बाजू झाली. सध्या तरी तालुक्यात माजी मंत्री थोरातांना ग्राऊंड लेव्हलवर तुल्यबळ राजकीय प्रतिस्पर्धी दिसून येत नाही, असे बोलले जाते.
संगमनेर तालुक्यातील आगामी सन 2025 ते 2030 या कालावधीसाठीच्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या महिला आरक्षणाची विशेष सोडत शुक्रवारी (दि.25) काढण्यात आली. 73 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे महिला आरक्षण सोडत जाहीर झाल्याची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
या आरक्षण सोडतीत महिला अनुसूचित जातीसाठी 6 गावे, अनुसूचित जमातीसाठी 12 गावे, नागरिकांचा विशेष मागास प्रवर्गासाठी 20 गावे तर सर्वसाधारण गटासाठी 35 गावे असे एकूण 73 गावांचे महिला सरपंच पद आरक्षित झाले आहे. गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकल्या नाही. त्यामुळे आता ग्रामपंचायती निवडणुकांकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. बुधवारी(दि.23) तालुक्यातील 144 ग्रामपंचायतीचे आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली होती. यामुळे महिला आरक्षणाकडे अनेकांचे लक्ष लागून होते. तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर महिलांना संधी मिळणार आहे.
महिलांसाठी सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे अनुसूचित जाती महीला ः गुंजाळवाडी, सांगवी, डिग्रस, खांबे, निमगाव खुर्द, कुरण.
अनुसूचित जमाती महिला ः- चनेगाव, लोहारे, खरशिंदे, मिर्झापुर, सावरगाव तळ, सोनोशी, तिगाव, ढोलेवाडी, निमगाव जाळी, कनोली, मालुंजे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-
काकडवाडी, पिंपरणे, कनोली ,वेल्हाळे, माळेगाव हवेली, जांबुत बुद्रुक, कर्जुले पठार, झरेकाठी, प्रतापपूर, आश्वी खुर्द, वडगाव पान, साकुर, खंदरमाळवाडी ,आश्वी बुद्रुक हे दाढ खुर्द, शिरसगाव, पोखरी हवेली, बोरबन, सादतपूर, मालदाड.
सर्वसाधारण गट महिला ः
अकलापूर, मलकापूर, वनकुटे, माळेगाव पठार, घारगाव, नांदूर खंदळमाळ, आंबे खालसा, रणखांबवाडी, नांदुरी दुमाला, मांडवे बुद्रुक, पोखरी बाळेश्वर पानवडी, चिंचोली गुरव, चिंचपुर बुद्रुक, मिरपुर, शेडगाव, दरेवाडी,चंदनापुरी, कौठे मलकापूर, कासारे, निमगाव बुद्रुक, निमोण, कौठे धांदरफळ, शिबलापूर, हिवरगाव पावसा, वरुडी पठार, देवकौठे, कर्हे, करुले, खांजापुर, निमगाव टेंभी, आंबी दुमाला या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.