छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आठ तास वाहतूक ठप्प; पोलिसांची मोठी कसरत Pudhari
अहिल्यानगर

Traffic jam: छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आठ तास वाहतूक ठप्प; पोलिसांची मोठी कसरत

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका: अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर घाटामध्ये रविवारी (दि.14) सकाळपासूनच वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे पाहावयास मिळाले. नादुरुस्त वाहने रस्त्यावर लावल्याने रस्त्याच्या दुतर्फा सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एमआयडीसी पोलिस व महामार्ग पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुमारे आठ तासांचा कालावधी लागला. (Latest Ahilyanagar News)

रविवारी पहाटे इमामपूर घाट परिसरामध्ये दोन ते तीन कंटेनर नादुरुस्त झाल्याने रस्त्यावरच बंद पडले होते. त्यामुळे महामार्गावरील दुभाजकाच्या पलीकडील लेनमधून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या बाजूलाही वाहतुकीची मोठी कोंडी झाली. रस्त्याच्या दुतर्फा सुमारे चार-पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज मोंढे व कर्मचाऱ्यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. अनेक रुग्णवाहिका व शासकीय वाहनांना देखील प्रवास करताना मोठी अडचण निर्माण झाली. या वाहतूक कोंडीमुळे सर्वच प्रवाशांंना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला.

अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून वळविण्यात आल्याने या महामार्गावर मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. महामार्गावरील खड्डे व झालेली दुरवस्था यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहने रस्त्यावरच नादुरुस्त होतात आणि वाहनांची कोंडी होते. खड्ड्यांमुळे मोठा मनःस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजी नगर महामार्गावरून वळविण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्याची गरज असताना उलट या महामार्गावर वर्दळ वाढली. महामार्गालगत अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या वाहनांवरदेखील कारवाई करण्याची गरज आहे.
- सोमनाथ हारेर, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा
घाटामध्ये नादुरुस्त झालेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने वाहने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
-बाजीराव आवारे, सरपंच, इमामपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT