अकोले : अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी गेलेल्या पिडितेच्या एकटेपणाचा फायदा घेत तपासी पोलिस अंमलदारानेच व्हॉट्सअपवर प्रेमाचे संदेश व व्हिडिओ कॉल करत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. विजय तबाजी आगलावे असे विनयभंग करणाऱ्या पोलिसाचे नाव असून त्याच्यावर अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Ahilyanagar News)
अकोले तालुक्यातील विवाहितेचा सासरी छळ होत असल्याच्या अन्यायाविरोधात पोलिसांत फिर्याद देण्यासाठी गेली होती. तिचा तक्रार अर्ज पोलिसांनी दाखल करून घेतला. त्याचा तपास विजय आगलावे यांच्याकडे देण्यात आला.
आगलावे तपासानिमित्त पीडितेच्या घरी गेले. त्यानंतर पिडितेचा तक्रार अर्जावरील मोबाईल नंबरवर प्रेमाचे मेसेज पाठविले. त्याला रिप्लाय न मिळाल्याने थेट व्हिडिओ कॉल करण्यास सुरुवात केली. एकटेपणाचा फायदा घेत पोलिसच त्रास देत असल्याने पिडिता अस्वस्थ झाली. तिने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर घडला प्रकार संगमनेरचे डीवायएसपी यांच्याकडे लेखी कळविला. वरिष्ठांनी त्याची दखल घेत त्या पोलिसांची बदली अकोलेहून संगमनेरला केली. मात्र त्या पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, म्हणून पिडीतेने आत्मदहन करण्याचा इशारा देताच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अश्लील संदेश पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विजय तबाजी आगलावे विरोधात अकोले पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 अन्वये 354 ऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.