Kopargaon Fake Fertilizer Pudhari
अहिल्यानगर

Kopargaon Fake Fertilizer Seizure: देर्डे-कोऱ्हाळे येथे 300 बनावट खत गोण्या जप्त; 7 सेवा केंद्रांवर गुन्हे

कोपरगावात कृषी विभागाची सलग कारवाई; 6.15 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पोहेगाव: देर्डे कोऱ्हाळे येथील गोदामातून 300 बनावट खताच्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाने कोपरगावात केलेल्या पाच कारवाईत सात कृषी सेवा केंद्रांसह चार खत उत्पादक कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

देर्डे-कोऱ्हाळे येथील गोदामात बनावट खतांच्या गोण्यांचे पॅकिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली. कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बीरदवडे यांनी पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांना सोबत घेत गोदामात छापा टाकला. छाप्यात गोदामामध्ये प्रथमदर्शनी सुमारे 300 खतांच्या गोण्या आढळून आल्या. पंचासमक्ष गोण्यांमधून नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात विविध कंपन्यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात खतांचा साठा केल्याचे निदर्शनास आले. 6 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शुक्रवारी तब्बल सात दुकानांवर व चार खत निर्मिती कंपन्यांवर कारवाई करत तब्बल 244 बनावट खत गोण्या जप्त करत कृषी विभागाने पाचवी कारवाई केली आहे. या कारवाईत झींक अधिक बोरॉन ह्या खताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात असे खतच नसल्याचा अहवाल आला असून झींक व बोरॉन आढळुन आले नाही. हे खत असलेल्या सात कृषी सेवा केंद्र व चार खत निर्मीती कंपन्यावर कोपरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देर्डे कोऱ्हाळे येथील उद्धव अर्जुनराव शिलेदार यांच्या गोदामावर छापा टाकण्यात आला.

तेथे विविध कंपन्यांच्या नावाने सुमारे 300 हून अधिक गोण्या आढळून आल्या. सुमारे 6 लाख 15 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात उद्धव शिलेदार यांच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश व अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या सलग कारवायांमुळे अवैधपणे बोगस खतांची साठवणूक व विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कंपनीचा खुलासा

ज्या कंपनीच्या नावाच्या गोण्या आढळल्या, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित खत आमच्या कंपनीचे नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बनावट पॅकिंगद्वारे फसवणूक होत असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक

तालुक्यात बनावट खतांचा सुळसुळाट वाढल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. पिकांचे उत्पादन वाढावे आणि दर्जा सुधारावा या अपेक्षेने शेतकरी बाजारातून खत खरेदी करतात; मात्र काही विक्रेते निकृष्ट किंवा बनावट खत विकून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे.

कृषी विभागाचा इशारा

कृषी विभागाने खत विक्रेत्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले असून बोगस खत विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, गोण्यांवरील तपशील तपासावा आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT