कान्हूरपठार : कान्हूरपठार व पठार भागास वरदान ठरणाऱ्या पिंपळगाव रोठा खंडेश्वर उपसा सिंचन योजनेच्या कामास गती मिळाली आहे. गोदावरी खोऱ्यातील तीन टप्प्यांत होणाऱ्या कामाच्या सर्वेक्षणाच्या कामास सुरुवात झाली असून, 90 लाखांचा निधी मंजूर झाल्याचे आ. काशिनाथ दाते यांनी सांगितले.
टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय विश्रामगृहात या संदर्भात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी भाजपचे राज्य कार्यकारुणी सदस्य विश्वनाथ कोरडे, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपअभियंता इंद्रजित यादव, कनिष्ठ अभियंता प्रशांत बुरुडे, सर्व्हेअर कन्सल्टंट शुभम सांगळे, सखाराम ठुबे, गोकुळ काकडे, वसंत शिंदे, एस. पी. ठुबे, विजय काकडे, सुभाष दुधाडे, कानिफनाथ ठुबे, अर्जुन नवले, दादाभाऊ ठुबे, रमेश गाडगे, सुयश वाळुंज, संग्राम पावडे, मच्छिंद्र ठुबे, संतोष जाधव, राजेंद्र बुचुडे, सुनील चिर्के, भरत ठुबे, मंगेश खोसे, हनुमंत भागवत, संदीप मगर आदी उपस्थित होते.
आ. दाते म्हणाले की, मुळा डॅम बॅक वॉटरमधून तब्बल 382 मीटर उंचीवर लिप्ट करण्यात येणार असून, 3500 क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून पठार भागाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. यामध्ये खडकवाडी, मांडवे खुर्द, वनकुटे आणि कान्हुरपठारसाठी खंडेश्वर उपसा सिंचन योजनेचा समावेश आहे. पठार भागावरील पाणीप्रश्नासाठी सतत प्रयत्नशील होतो.
आता त्याला कुठेतरी यश येताना दिसत आहे. या पाठीमागे वीज बिलाची मोठी अडचण होती. परंतु आता मुळा डॅम धरणावरच सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे व लिप्टसाठी लागणारी वीज तेथेच मिळणार आहे. या संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे पठार भागावरील शेतीच्या सिंचनाचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचा आशावाद आ. दाते यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळमुक्त महाराष्ट्र धोरणास गती मिळत आहे. मंत्री विखे यांनी दिलेला शब्द आणि आ. दाते यांचे निःस्वार्थी भावनेतून होत असलेले प्रयत्न याला यश मिळताना दिसत असल्याचे विश्वनाथ कोरडे यांनी सांगितले.