Pathardi Repeater Exam Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Repeater Exam: पाथर्डीतील रिपीटर परीक्षा केंद्र संशयाच्या भोवऱ्यात; डमी विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

तपासणीत डमी विद्यार्थी आढळले नाहीत; मात्र पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूरमधील परीक्षार्थ्यांच्या उपस्थितीने वाढला संशय

पुढारी वृत्तसेवा

नगर: सध्या दहावी आणि बारावीत नापास झालेल्यांची (रिपीटर) पुनःपरीक्षा सुरू आहे. पाथर्डीतील एका केंद्रावर डमी विद्यार्थी परीक्षेला बसल्याची माहिती एका इसमाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना दिली अन् प्रशासनाची धावपळ सुरू झाली. पथकाने थेट केंद्रावर जाऊन प्रवेशपत्र व ओळखपत्रांची पडताळणी केली असता, एकही ‘डमी’ विद्यार्थी आढळला नाही. मात्र, या केंद्रावर पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांतील परीक्षार्थी आढळल्याने संबंधित केंद्र संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे.

परीक्षा दहावीची असो की बारावीची, पाथर्डी तालुका हा कॉपीप्रकरणात हॉटस्पॉट म्हणून संबोधला जातो. आता रिपीटर परीक्षेतही पाथर्डीतील केंद्र चर्चेत आली आहेत. सध्या पाथर्डीच्या ‘त्या’ दोन केंद्रांवर 10 वी आणि 12 वीची रिपीटरची परीक्षा सुरू आहे. 12 वीचे फिजीक्स व केमिस्ट्री विषयासाठी 57 व 173, तर 10 वीचे 155 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. दरम्यान, शनिवारी सीईओ भंडारी यांना एका व्यक्तीने फोन करून पाथर्डीत डमी विद्यार्थी परीक्षेला बसल्याची माहिती दिली.

सीईओंनी तत्काळ माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना चौकशीच्या सूचना केल्या. विस्तार अधिकारी ढवळे यांच्यासह त्यांचे पथक शनिवारीच केंद्रावर पोहचले. प्रत्येकाने साधारणतः 10 ते 12 परीक्षार्थींचे प्रवेशपत्र व ओळखपत्र तपासले. फोटो, स्वाक्षरी तसेच त्यांची कुटुंबीयांकडे फोनवरून खातरजमाही केली. या सर्व प्रक्रियेत एकही विद्यार्थी डमी आढळला नाही. हे सर्व विद्यार्थी 17 नंबरचा फॉर्म भरून पाथर्डी केंद्रावर परीक्षेला बसल्याचे समोर आले.

दरम्यान, काल सोमवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी दोन भरारी पथकांतील 10 जणांसह पाथर्डी गाठली होती. यावेळी केंद्रावर गणिताचा पेपर सुरू होता. त्यांनी ओळखपत्र, प्रवेशपत्राची पडताळणी केली. मात्र, ‘डमी’ विद्यार्थी आढळले नाही.

पाथर्डी पॅटर्न!

पाथर्डीच्या परीक्षा केंद्रावर रिपीटर बहुतांशी पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांतील असल्याची धक्कादायक बाब चौकशीत निदर्शनास आली. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यांतील नापास झालेले परीक्षार्थी हे फेरपरीक्षा देण्यासाठी पाथर्डीतच का येतात, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पाथर्डी सेंटर घेण्यासाठी तसेच या ठिकाणी परीक्षार्थींना ‘मदत’ करण्यासाठी मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत सीईओंनीही गंभीरपणे दखल घेतली आहे. याबाबत स्वतः बारकाईने चौकशी करणार असल्याचे सीईओ भंडारी यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT