Fraud Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Reel Star Case: रीलस्टार निघाले लुटारू! माय-लेकाला मारहाण करून ६९ हजारांचा ऐवज लंपास

शेकटे फाट्याजवळील घटना; सुजित चौधर, कोमल काळे आणि अन्य दोघांविरुद्ध फिर्याद

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर दुचाकीवर प्रवास करणाऱ्या मायलेकांना दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी अडवून मारहाण केली.

त्यानंतर आईच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील सोन्याचे दागिने, नऊ हजार रुपयांची रोकड आणि मित्राची दुचाकी असा एकूण ६९ हजार रुपयांचा ऐवज नेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुजित चौधर, कोमल काळे आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, तिसगाव येथील दीपक योसेफ गरुड (वय २३) हा टेम्पोचालक असून, तो आई मैना गरुड यांच्यासोबत गुरुवारी (दि. २२) सायंकाळी सोनोशी येथे मावशीच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याच्या आईने अॅक्सिस बँकेकडून घेतलेल्या कर्जातील सात हजार रुपये काढून घरी आणले होते. हे पैसे सोबत घेऊन मायलेक मित्राच्या दुचाकीवरून प्रवास करीत होते.

रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची दुचाकी शेकटे फाट्याजवळ आली असता, मागून आलेल्या पल्सर दुचाकीवरील पुरुष आणि महिलेने त्यांना रस्त्यात आडवे वाहन लावून थांबविले. त्याचवेळी दुसऱ्या दुचाकीवरून आणखी दोघे तेथे आले. त्यानंतर चौघांनी मायलेकांना दुचाकीवरून खाली उतरविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादी दीपक याने पल्सरवरील पुरुष व महिलेला सोशल मीडियावरील रीलमधून ओळखत असल्याचे सांगितले. त्याने त्यांची नावे सुजित चौधर आणि कोमल काळे अशी नमूद केली आहेत. यानंतर कोमल काळे हिने आई मैना गरुड यांच्या पर्समधील सात हजार रुपये काढून घेतले. तसेच त्यांना पकडून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील सोन्याची फुले काढून घेतल्याचा आरोप आहे.

दरम्यान, सुजित चौधर याने दीपकला मारहाण करून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी दीपकला पकडून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर चौघांनी मित्राची दुचाकीही घेऊन घटनास्थळावरून पलायन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घटनेनंतर मायलेक पोलिसांसोबत पोलिस ठाण्यात आले. या घटनेत सात हजार रुपये आईकडील रोकड, दोन हजार रुपये फिर्यादीकडील रोकड, अंदाजे २० हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रुपयांची सोन्याची फुले आणि २० हजाराची दुचाकी असा एकूण ६९ हजारांचा ऐवज गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

‘बंटी-बबली’ला यापूर्वीही अटक

शेवगाव-पाथर्डी परिसरासह एसटी बसमध्ये महिला प्रवाशांच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या कोमल नागनाथ काळे आणि तिचा साथीदार सुजित राजेंद्र चौधर या दोघांना यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ९ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. कोमल ही सोशल मीडियावर रीलस्टार म्हणून प्रसिद्ध असून, तिचे ६० हजार फॉलोअर्स असल्याची माहिती समोर आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT