Arrest Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Crime: पाथर्डीत पुजाऱ्याची आत्महत्या; कर्जछळ प्रकरणी तिघांवर गुन्हा, एक अटकेत

सुसाईड नोटमधून आरोप उघड; 30 हजार कर्जासाठी 7 लाख परत करूनही छळ

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील धामणगाव देवी येथील पुजारी रामदास बापुराव शिंदे (वय 50) यांनी कर्जाच्या छळाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. सुसाईड नोटमधील मजकुराच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली.

20 वर्षांपासून गावातील जगदंबा देवी मंदिरात रामदास शिंसे हे पुजारी म्हणून कार्यरत होते. तसेच शेती व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. 2 एप्रिल रोजी दुपारी शिंदे घरातून बाहेर गेलेले शिंदे रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत.

दरम्यान, 3 एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता ते शेतातील विहिरी जवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. पोलिसांना शिंदे यांच्या पॅन्टच्या खिशात एक चिट्ठी (सुसाईड नोट) आढळून आली.

त्यात अनिल बाबुराव पवार (साकेगाव), महेश अनिल पवार (साकेगाव) आणि अर्जुन माने (पाथर्डी) यांच्यावर छळ केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. चिट्ठीतील मजकुरानुसार, त्यांनी 30 हजार रुपये घेतले होते, मात्र आतापर्यंत सुमारे 7 लाख रुपये परत करूनही संबंधित व्यक्तींकडून वारंवार मानसिक त्रास व कुटुंबीयांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले जात होते. या सततच्या छळामुळेच आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.

मृत रामदास शिंदे यांच्या मुलीने पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, संबंधित तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी अनिल बाबुराव पवार याला अटक केली असून, पाथर्डी न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT