पाथर्डी: पाथर्डी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातील मोकळ्या जागेत उभ्या करण्यात आलेल्या काही टपऱ्यांना सोमवारी (दि. 25) सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर काही अतिक्रमणधारकांनी हटविलेल्या टपऱ्या जुन्या बसस्थानक परिसरात आणून ठेवल्या होत्या. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जुन्या बसस्थानकातून शेवगाव रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या कचऱ्याला आग लावण्यात आली होती. या आगीने काही क्षणांतच उग्र रूप धारण केले आणि जवळ उभ्या असलेल्या टपऱ्यांनी आगीचा विळखा घेतला.
पाहता पाहता तीन ते चार टपऱ्या जळून खाक झाल्या. काही टपऱ्यांमध्ये लाकडी फर्निचर तसेच न वापरातील साहित्य ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीने अधिक तीव्र स्वरूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
दरम्यान, आगीची झळ शेजारील काही दुकानांपर्यंत पोहोचली होती. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित अथवा मोठी वित्तहानी झाली नाही. सकाळच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ कमी असल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.
या घटनेची माहिती एसटीचे सफाई कर्मचारी अमोल दिनकर, तसेच पालिकेचे सफाई कर्मचारी विकास दिनकर व अमोल पठारे यांनी अग्निशमन दलाला दिली. त्यांनी मदतकार्यातही सक्रिय सहभाग घेतला. तसेच पालिका कर्मचारी अशोक बडे, वैभव दिनकर, अंबादास दिनकर, दीपक आव्हाड यांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले.