Pathardi News Pudhari
अहिल्यानगर

Pathardi News: कपाशीच्या शेतात गांजाची लागवड; ११.६०० किलो गांजासह सराईत हद्दपार आरोपी ताब्यात

पाथर्डी तालुक्यातील जांभळी शिवारात कपाशीच्या पिकात अमली पदार्थांची लागवड केल्याप्रकरणी कारवाई. ११ किलो ६०० ग्रॅम वजनाची पाच झाडे जप्त; किंमत २.३२ लाख रुपये.

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: कपाशीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी केलेल्या कारवाईत ११ किलो ६०० ग्रॅम वजनाची गांजाची पाच लहान-मोठी झाडे जप्त केली. पाथर्डी तालुक्यातील जांभळी शिवारात बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

किशोर बन्सी जायभाये (रा. येळी,पाथर्डी) याला ताब्यात घेण्यात आले. जप्त गांजाची किंमत २ लाख ३२ हजार रुपये आहे.

एसपी सुदर्शन मुम्मका यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलिस अंमलदार विकास साळवे, गणेश लोंढे, भगवान सानप, बाळासाहेब खेडकर व वंदना मोढवे यांच्या पथकाला अवैध धंद्याची माहिती काढून कारवाईचे आदेश दिले.

किशोर जायभाये याने जांभळी शिवारातील शेतात कपाशीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती या पथकाला बुधवारी रात्री मिळाली. पाथर्डी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक आणि पाथर्डी पोलिसांचे पथक पंचांसह संबंधित शेतात दाखल झाले.

पोलिसांनी किशोर जायभाये याच्या उपस्थितीत पंचांसमक्ष शेताची पाहणी केली असता कपाशीच्या पिकामध्ये गांजाची पाच लहान-मोठी झाडे आढळून आली. पोलिसांनी ११ किलो ६०० ग्रॅम वजनाची ही गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस दफ्तरी पसार अन्‌ हद्दपारही

किशोर जायभाये याच्या गुन्हेगारी अभिलेखाची तपासणी केली असता तो पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो सराईत गुन्हेगार असून ३० जानेवारी २०२४ पासून दोन वर्षांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील शिरूर व आष्टी तालुक्यांतून त्याला हद्दपार केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT