पाथर्डी: तालुक्यात सुरू असलेल्या अवैध मटका धंद्याविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. ८) धडक कारवाई केली. पाथर्डी शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मटका घेणाऱ्या अनेकांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल फोन, दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन असा ५ लाख १८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार गणेश लोंढे, कॉन्स्टेबल रणजित जाधव, प्रकाश मांडगे व सतीश भवर हे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या आदेशाने पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाथर्डी पोलिसांच्या सहकार्याने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली.
माणिकदौंडी चौक येथे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये कल्याण मटका खेळविला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी ४.१० वाजता छापा टाकला. यावेळी अतुफ खलील शेख (वय ३२) व अवेज जावेद शेख (वय २७, दोघे रा. माळी बाभूळगाव, ता. पाथर्डी), यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, दोन मोबाईल फोन व स्विफ्ट कार असा ४ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.चिंचपूर रोडवरील मराठी शाळेसमोर दुचाकीवरून मटका घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी ४.३५ वाजता छापा टाकण्यात आला. यावेळी अतिक अब्दुलवहाब शेख (वय ३७, रा. चिंचपूर रोड, कुंभारभट्टी, पाथर्डी) याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडून रोख रक्कम, दोन मोबाईल फोन व टीव्हीएस व्हेगो दुचाकी असा ६० हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अतिक शेख यानेही इजाज शेख व लखन उर्फ इस्माईल शेख यांच्या सांगण्यावरून आर्थिक फायद्यासाठी मटका घेत असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.आखार भागातील सन टेलरजवळ पत्र्याच्या शेडसमोर मटका घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी ५.०५ वाजता छापा टाकण्यात आला. यावेळी मनोज बाळू भागवत (वय २६, रा. आखार भाग, पाथर्डी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून रोख रक्कम व आयफोन-१३ असा ३३ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यानंतर त्याच परिसरातील दुचाकीवरून मटका घेत असल्याची माहिती मिळाल्याने सायंकाळी ५.३५ वाजता कारवाई करण्यात आली.
यावेळी अविनाश बाबासाहेब पाचारणे (३१, रा. कजबा पेठ, पाथर्डी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी असा ७३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी हा मटका व्यवसाय इजाज शेख व लखन उर्फ इस्माईल शेख यांच्या सांगण्यावरून चालवत असल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, कोरडगाव रोडवरील सोसायटी पेट्रोल पंपासमोर सायंकाळी ५.५५ वाजता करण्यात आलेल्या कारवाईत विजय राम खोले (वय ५९, रा. इंदिरानगर, पाथर्डी) याच्याकडून रोख रक्कम व मटका खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. विजय खोले हा कोणासाठी मटका घेत होता, त्याचा शोध पोलिस घेत आहे.