House Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Housing Scheme: पाथर्डीत १० हजार ५०९ घरकुले अपूर्ण; निधी घेऊनही काम न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

१२ हजार ७९३ घरकुलांना मंजुरी; ५ हजार ९२८ घरकुलांचे काम अद्याप सुरूच नाही, निधी वसुलीसह मंजुरी रद्द करण्याचा पंचायत समितीचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध घरकुल योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुलांना मंजुरी मिळाली असली, तरी लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे हजारो घरकुलांची कामे रखडली आहेत. तालुक्यात मंजूर असलेल्या १२ हजार ७९३ घरकुलांपैकी १२ हजार ३५२ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्यापैकी ६ हजार २८० लाभार्थ्यांना दुसरा, तर ४ हजार ७ लाभार्थ्यांना तिसरा हप्ताही देण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत केवळ २ हजार १२६ घरकुले पूर्ण झाली असून, तब्बल १० हजार ५०९ घरकुले अपूर्ण आहेत. यातील ५ हजार ९२८ घरकुलांची कामे अद्याप सुरूच झाले नाहीत. घरकुल योजनेच्या संथगतीला आता वेग देण्यासाठी पंचायत समितीने कठोर भूमिका घेतली आहे.

तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन घरकुल लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन काम सुरू करण्यासाठी आग्रह धरण्यात येणार आहे. यासाठी ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून हे पथक गावागावांत एकाच दिवशी भेटी देणार आहे.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र धस यांनी नुकताच ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत घरकुल योजनेचा आढावा घेतला. ज्या घरकुलांची कामे सुरू आहेत, ती तातडीने पूर्ण करावीत आणि ज्या लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊनही काम सुरू केलेले नाही, त्यांनी त्वरित बांधकाम सुरू करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

पहिला हप्ता मिळूनही घरकुलाचे काम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांना आता निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. शासनाकडून मिळालेला निधी घेऊनही काम सुरू केले नाही, तर संबंधित लाभार्थ्यांकडून शासकीय निधीची वसुली करून घरकुलाची मंजुरी रद्द केली जाईल. त्यानंतर मंजुरी रद्द झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील, असे पंचायत समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, दोन ते तीन हप्ते मिळूनही हजारो लाभार्थ्यांनी अद्याप घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे अपूर्ण घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याबरोबरच निधी घेऊनही काम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची भूमिका पंचायत समितीने घेतली आहे.मागील महिन्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी यांनी पाथर्डी पंचायत समिती येथे घरकुल योजनेचा आढावा घेतला होता.

तालुक्यात घरकुल योजना राबविण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत परिस्थितीत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा न झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.त्यानंतर पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी राजेंद्र धस यांनी घरकुल योजनेला प्राधान्य देत ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला. घरकुलाची कामे सुरू करा, सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.

ज्या लाभार्थ्यांनी अद्याप घरकुलाचे बांधकाम सुरू केलेले नाही, त्यांच्या घरापर्यंत पंचायत समितीचे पथक पोहोचणार आहे. लाभार्थ्यांना बांधकाम सुरू करण्यास प्रवृत्त केले जाणार असून, शासनाचा निधी घेऊनही काम न करणाऱ्यांना निधी परत करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. काम सुरू न केल्यास मंजुरी रद्द करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

वसुली करून मंजुरी रद्द करणार : धस

तालुक्यात घरकुलाची कामे संथगतीने सुरू आहेत. त्यांना वेग देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जे लाभार्थी काम सुरू करणार नाहीत, त्यांच्याकडून शासकीय निधीची वसुली करून मंजुरी रद्द केली जाईल. त्यानंतर कोणाचीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. लाभार्थ्यांनी घरकुलाची कामे पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी राजेंद्र धस यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT