Student Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Hostel Student Death: पाथर्डीत वसतिगृहातील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

शिक्षकाकडून त्रास व मारहाण होत असल्याचा वडिलांचा आरोप; नातेवाइकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: शहरातील हिंद वसतिगृहात १३ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी (दि. २१) उघडकीस आले. समर्थ आबासाहेब खरात (रा. कवडगाव, ता. गेवराई, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. वसतिगृहातील शिक्षक सुभाष घुगे समर्थला त्रास देत आणि मारहाण करत असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे. पोलिसांनी घुगेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, समर्थच्या मृत्यूबाबत नातेवाइकांनी घातपाताचा संशयही व्यक्त केल्याने शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

समर्थ पाथर्डी येथील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयात सातवीत शिकत होता. तो सन २०२४ पासून हिंद वसतिगृहात राहत होता. त्याचा लहान भाऊ साईदेखील याच वसतिगृहात राहत आहे. तीन महिन्यांपासून वसतिगृहातील शिक्षक सुभाष घुगे विनाकारण त्रास देत असल्याचे समर्थने वडील आबासाहेब खरात यांना यापूर्वी सांगितले होते. शिक्षक मारहाण करत असल्याचे लहान भाऊ साई यानेही वडिलांना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

मुलाकडून तक्रार मिळाल्यानंतर आबासाहेब खरात यांनी सुमारे महिनाभरापूर्वी वसतिगृहात जाऊन शिक्षक घुगे यांची भेट घेतली होती. समर्थला त्रास का देता, अशी विचारणा त्यांनी केली असता, मुलाला कोणताही त्रास देत नसल्याचे शिक्षकांनी सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी साईचे जेवणाचे ताट हरवले होते. त्यावरून मुलांना त्रास दिला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी पुन्हा वसतिगृहात जाऊन शिक्षकांची भेट घेतली. ताट मिळवून देण्याचे सांगत मुलांना त्रास देऊ नये, अशी विनंती त्यांनी केली होती.

दरम्यान, बुधवारी (दि. २१) सकाळी सव्वादहाच्या सुमारास समर्थने वडिलांना फोन करून पोट दुखत असून शौचास जायचे आहे आणि दवाखान्यात जायचे आहे, असे सांगितले. त्यासाठी त्याने तीस रुपये पाठविण्याची विनंती केली. वडिलांनी त्याला पैसे पाठवून दिले. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास साईने फोन करून समर्थ वसतिगृहात बेशुद्धावस्थेत पडल्याचे सांगितले. समर्थला उपजिल्हा रुग्णालयात नेल्याचे शिक्षकांनी सांगितले. वडील रुग्णालयात पोहोचले असता डॉक्टरांनी समर्थचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

मुलाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत खरात यांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वसतिगृह प्रशासनाच्या भूमिकेबाबतही नातेवाइकांनी प्रश्न उपस्थित केले. आबासाहेब खरात यांच्या फिर्यादीवरून बुधवारी पाथर्डी पोलिस ठाण्यात शिक्षक सुभाष घुगे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

समर्थच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनाच्या प्रक्रियेवरूनही प्रश्न निर्माण झाले. नातेवाइकांनी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) पाठविण्यात आला. या घटनेमुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांशी होणारे वर्तन आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष दिले जाते का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT