Fake Job Letter Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Job Fraud: ‘आरोग्यसेवक’ची नोकरी लावण्याचे आमिष; बनावट कागदपत्रांद्वारे ५९.५० लाखांची फसवणूक

जिल्हा परिषदांच्या भरतीतील वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना नोकरीचे आश्वासन; कल्याणच्या दोघांविरुद्ध पाथर्डी पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: आरोग्यसेवक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे तयार करत पाथर्डी तालुक्यातील काही तरुणांच्या नातेवाईकांकडून तब्बल ५९ लाख ५० हजार रुपये घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चुंबळी येथील सेवानिवृत्त नौदल कर्मचारी वैजीनाथ गहीनीनाथ ढाकणे (वय ६३) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात जितेंद्र पुंडलिक वारगडे (रा. कल्याण) आणि रविकुमार ऊर्फ प्रवीणकुमार राजेंद्रनाथ तिवारी (रा. कल्याण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, ढाकणे हे नौदलातून २०२४ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण झाले असून त्या नोकरीच्या शोधात होत्या. नौदलातील ओळखीचे जितेंद्र वारगडे यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये संपर्क साधून जिल्हा परिषद अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर तसेच केडीएमसी ठाणे येथील आरोग्य सेवक व लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेतील वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी प्रत्येकी १३ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितल्याचा आरोप आहे.

त्यानंतर कल्याण येथील एका हॉटेलमध्ये ढाकणे व अन्य व्यक्तींची वारगडे आणि तिवारी यांच्याशी भेट झाली. यावेळी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत रोख रक्कम घेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढे ढाकणे, त्यांचे चुलतभाऊ, मेव्हणे, पुतणे व भाचे अशा अनेकांकडून तिवारी यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस तसेच ऑनलाईन माध्यमातून लाखो रुपये पाठविण्यात आले.

फिर्यादीनुसार, ढाकणे यांनी स्वतः १५ लाख रुपये, तर त्यांच्या चुलतभावाने २० लाख ९९ हजार रुपये दिले. तसेच अन्य नातेवाईकांकडूनही लाखो रुपये घेण्यात आले. अशा प्रकारे एकूण ५९ लाख ५० हजार रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फसवणूक करण्यासाठी आरोपींनी उमेदवारांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले. त्यासाठी ई-मेलवर पत्र पाठविण्यात आले होते. ५ मे २०२५ रोजी उमेदवारांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिवारी व अन्य एक व्यक्ती उपस्थित होते. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ई-मेल दाखवून उमेदवारांची नोंदणी व वैद्यकीय तपासणी करून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर ११ जुलै २०२५ रोजी तिवारी यांनी उमेदवारांची कथित अंतिम निवडयादी व्हॉट्सॲपवर पाठविली. मात्र, त्यानंतर जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे चौकशी केली असता २०२३ मधील आरोग्यसेवक भरती प्रक्रियेत वेटिंग लिस्टमधील कोणत्याही उमेदवाराची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे व छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत चौकशी केली असता तेथेही अशीच माहिती मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी व नातेवाईकांच्या लक्षात आले.

त्यानंतर वैजीनाथ ढाकणे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात धाव घेत वारगडे व तिवारी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. नोकरीचे आमिष, बनावट कागदपत्रे व विविध बँक व्यवहारांच्या माध्यमातून मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला असून, पाथर्डी पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT