Pathardi Tiranga Rally Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Tiranga Rally: पाथर्डीत ३५० फुटी तिरंग्याची भव्य रॅली; शहर झाले तिरंगामय

लेझीम पथक आणि देशभक्तीपर गीतांनी वाढविला उत्साह; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला फ्लाईंग बर्ड स्कूल अकॅडमीच्या वतीने शहरातून सुमारे साडेतीनशे फूट लांबीचा भव्य तिरंगा घेऊन रॅली काढण्यात आली. या रॅलीमुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक तिरंगामय झाले होते. लेझीम पथकाच्या आकर्षक सादरीकरणासह देशभक्तीपर व भक्तिमय गीतांनी वातावरणात उत्साह आणि देशप्रेमाची भावना निर्माण केली.

शहरातील माहेश्वरी श्रीराम मंदिर येथून मान्यवरांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीला प्रारंभ करण्यात आला. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते. रॅली मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी थांबून भव्य तिरंग्याचे स्वागत केले. लेझीम पथकाच्या तालावर आणि देशभक्तीपर गीतांच्या सुरावर सहभागींचा उत्साह अधिकच वाढला.रॅली गांधी चौक, मेन रोड, क्रांती चौक, अजंठा चौक, नाईक चौक, कोरडगाव चौक मार्गे शेवगाव रोडवर पोहोचली. या संपूर्ण मार्गावर नागरिकांची उत्सुकता पाहायला मिळाली. साडेतीनशे फूट लांबीचा तिरंगा रस्त्यावरून जात असताना अनेकांनी त्याचे छायाचित्रण केले. या अनोख्या उपक्रमामुळे शहरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अधिकच वाढला.

डॉ. मृत्युंजय गर्जे म्हणाले, स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. तिरंगा हा केवळ ध्वज नसून देशाच्या स्वाभिमानाचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांच्या माध्यमातून देशभक्तीची भावना मनात रुजवावी. राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा.

डॉ. दीपक देशमुख म्हणाले, साडेतीनशे फुटी तिरंगा घेऊन काढलेली ही रॅली पाथर्डीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. तिरंग्याखाली सर्व जाती-धर्म आणि विचारांचे नागरिक एकत्र येतात, हा आपल्या देशाच्या एकतेचा संदेश आहे. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे.

राष्ट्र प्रथम ही भावना प्रत्येकाच्या मनात कायम जागृत राहावी.संस्थेच्या संस्थापक ज्योती ढाकणे यांची मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, संस्थेचे सचिव डॉ. दीपक देशमुख, नगरसेवक अमोल गर्जे, अ‍ॅड. प्रतीक खेडकर, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष वैभव शेवाळे, गोपालसिंग शेखावत, सोनू गुगळे, मुकुंद लोहिया शाळेचे प्रतिनिधी मनोज गोल्हार,जयराम ढाकणे,अनुराधा कोरी,राधिका गुजर,रावसाहेब मोरकर रवींद्र धायतडक आदी उपस्थित होते.फ्लाईंग बर्ड स्कूल अकॅडमीच्या या भव्य तिरंग्यामुळे रॅलीचा मार्ग आकर्षणाचे केंद्र बनला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT