शेतकरी महिलेची पूर्ण दीड एकर शेती पाण्याच्या प्रचंड प्रवाहात मातीसकट वाहून गेली Pudhari
अहिल्यानगर

Farmer Flood Loss: महिलेचा हंबरडा अन् सार्‍यांना गहीवर..! वाहून गेली दीड एकर शेती

ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी : तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. शनिवारी तालुक्याच्या पूर्व भागातील गावांचा आमदार मोनिका राजळे यांनी पाहणी दौरा केला. या दौर्‍यात कुत्तरवाडी येथील एक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग घडला. रंजना प्रल्हाद दहिफळे (वय 55) या शेतकरी महिलेची पूर्ण दीड एकर शेती पाण्याच्या प्रचंड प्रवाहात मातीसकट वाहून गेली. त्याबरोबरच वाहून गेली डोळ्यांतील आसवे.. (Latest Ahilyanagar News)

दहिफळे यांचे संपूर्ण जीवन या शेतीवर अवलंबून. त्यांचा एकुलता मुलगा भोळसर असल्याने आयुष्याचा संपूर्ण आधारच हरपल्याची भावना त्यांच्या मनात होती. आपली शेती कुठेच दिसेना फक्त सातबारा आहे. पुढे काय करायचे, कसे जगायचे याची चिंता त्यांना सतावत असतानाच आमदार मोनिका राजळे पाहणीसाठी पोहोचल्या. त्यांना पाहताच रंजना दहिफळे यांनी हंबरडा फोडला. महिलेचा हा हंबरडा उपस्थितांना गहिवर आणणारा ठरला.

या प्रसंगाने भावूक झालेल्या आमदार राजळे यांनी तत्काळ महिलेचे सांत्वन करत, शासकीय यंत्रणेकडून वस्तुनिष्ठ पंचनामे करून घेण्यात येतील. शासन दरबारी मी स्वतः पाठपुरावा करीन. शक्य तेवढी जास्तीत जास्त मदत तुम्हाला मिळवून देईन, असे आश्वासन दिले. आमदार

आ. राजळे यांनी अधिकार्‍यांना दहिफळे यांच्या शेताची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. गेल्या तीन दिवसांपासून आमदार राजळे ह्या तालुक्याच्या गावागावात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. अतिवृष्टीचा पावसाने तालुक्यातील माळीबाभुळगाव, मोहरी, कारेगाव, मोहटा, करोडी, कुत्तरवाडी, चिंचपुर इजदे, पिंपळगाव टप्पा, मानेवाडी, चिंचपुर पांगुळ, जोगेवाडी, ढाकणवाडी, वडगाव अशा अनेक गावांतील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या सर्व गावांचा आमदार राजळे यांनी प्रत्यक्ष दौरा करत बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. अनेक ठिकाणी त्यांनी बिगर चपल घालता थेट चिखलातून चालत शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दौर्‍यात प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जलसंधारणांचे उपविभागीय अधिकारी प्रवीण दहातोंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहुल कांबळे, कृषी अधिकारी वैभव थोरे, वन विभागाचे बबन मंचरे यांसह विविध प्रशासकीय यंत्रणेतील प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT